जोरहाट,
Five killed in military plane crash in Assam आसाममधील जोरहाट हवाई तळावर भारतीय हवाई दलाचे एएन-32 प्रकारचे मालवाहू विमान उतरण्याच्या प्रयत्नात कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात विमानातील पाच जवान हुतात्मा झाले, तसेच सहवैमानिक बचावल्याचे आणि त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय हवाई दलाचे अँटोनोव्ह एएन-३२ हेलष्करी मालवाहू विमान पुरवठा आणि सैनिकी साहित्य वाहतुकीसाठी वापरले जाते. जोरहाट हवाई तळावर उतरताना विमान अचानक नियंत्रणाबाहेर गेले आणि जमिनीवर कोसळले. प्राथमिक माहितीनुसार, लँडिंगदरम्यान झालेल्या तांत्रिक किंवा मानवी चुकांमुळे हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अपघातानंतर विमानाला आग लागली होती, जी नंतर नियंत्रणात आणण्यात आली. घटनास्थळी तातडीने बचाव पथके आणि हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले असून परिसर सील करण्यात आला आहे. संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.भारतीय हवाई दलाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. सर्व शक्यता तपासल्या जात असून अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे. या दुर्घटनेनंतर लष्करी वर्तुळात शोककळा पसरली असून, अपघातामुळे हवाई दलाच्या सुरक्षा प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढील तपासातून अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.