धाराशिव
cake poisoning case धाराशिव तालुक्यातील बेंबळी गावात वाढदिवसासाठी खरेदी केलेला केक खाल्ल्यानंतर ५० वर्षीय महिलेला विषबाधा झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. केक सेवन केल्यानंतर काही वेळातच महिलेला तीव्र पोटदुखी, मळमळ आणि सतत उलट्या होऊ लागल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून बेकरीच्या अन्नसुरक्षा मानकांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या वाढदिवसानिमित्त बेंबळीतील एका स्थानिक बेकरीमधून केक खरेदी करण्यात आला होता. हा केक संबंधित महिलेनेही खाल्ला. मात्र केक खाल्ल्यानंतर अल्पावधीतच तिची प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी तत्काळ तिला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने कुटुंबातील इतर सदस्यांनी केकचे सेवन न केल्याने ते या त्रासातून बचावले.
रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केल्यानंतर महिलेची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. आवश्यक उपचारानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असून तिला लवकरच घरी सोडण्यात येण्याची शक्यता आहे.
या घटनेची नोंद बेंबळी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून विषबाधेचे नेमके कारण केकच आहे का, याबाबत अद्याप अधिकृत प्रयोगशाळा अहवाल प्राप्त झालेला नाही. मात्र केक खाल्ल्यानंतरच प्रकृती बिघडल्याने संबंधित बेकरीबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतरcake poisoning case नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून बेकरी आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची नियमित तपासणी होते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. बेकरीमध्ये वापरले जाणारे कच्चे साहित्य, क्रीम, अंडी, रंगद्रव्ये तसेच साठवणूक पद्धती यांची योग्य तपासणी होत नसल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
संबंधित बेकरीचे नमुने तातडीने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत, दोष आढळल्यास परवाना रद्द करावा तसेच जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
या प्रकरणामुळे जिल्ह्यात अन्नसुरक्षेच्या अंमलबजावणीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.