धामणगावात आढळली दुर्मिळ ‘फोर्स्टेन कॅट स्नेक’ची जोडी

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
*स्वाबच्या सर्पमित्रांनी दिले जीवनदान

तळोधी (बा.), 
'Forsten's Cat Snake' ब्रम्हपुरी वन विभागाच्या तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रातील धामणगाव (माल) येथे दुर्मिळ ‘फोर्स्टेन कॅट स्नेक‘ची जोडी आढळून आली. या सापांना स्वाब संस्थेच्या सर्पमित्रांनी यशस्वीरित्या ‘रेस्क्यू’ करून जीवनदान दिले. धामणगाव (माल) येतील आविष्कार दुबे यांना रात्री 9 वाजता अंगणातील मंडपावर एक लांब काळे-पांढरे चौकर असलेला तपकिरी काळसर रंगाचा साप दिसला. त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर यांना दिली. कायरकर हे संस्थेचे बचाव दल प्रमुख जीवेश सयाम व चमू घेऊन धामणगाव येथे पोहोचले.
 
 
Cat Snake
 
यावेळी त्यांना अंदाजे 5 ते 6 फूट लांबीच्या एक ‘फोर्स्टेन कॅट स्नेक’ दिसला. या निमविषारी सापाला रेस्क्यू करीत असतानाच बाजूला अंगणातील झाडावर त्यापेक्षाही मोठा 7 फूट लांबीचा आणखी एक साप आढळून आला. सर्प मित्रांनी झाडावर चढून त्याला सुरक्षित रेस्क्यू केले. दुर्मिळ होत चाललेले फोर्स्टेन कॅट स्नेक हे ‘निम विषारी’ असून, त्यांच्या तपकिरी रंगाच्या शरिरावर मानेपासून शेपटीपर्यंत फिक्कट पांढर्‍या रंगाचे आडवे पट्टे असतात. घोणस सापाच्या डोक्याप्रमाणे त्यांच्या त्रिकोणी आकाराच्या डोक्यावर डोळे असतात. हे मोठे डोळे मांजराच्या डोळ्याप्रमाने उठून दिसतात. अत्यंत शांत स्वभावाचा निशाचर असलेला हा साप भारतात बहुतेक जंगलात आढळतो. चंद्रपूर जिल्ह्यात या सापाबद्दल चारच नोंद असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यापैकी ब्रम्हपुरी वन विभागामधील तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रात 2 नोंदी असून, ही जोडी पकडल्यानंतर जिल्ह्यात एकूण 6, तर तळोधी परिसरात एकूण 4 नोंदी करण्यात आल्या आहे, अशी माहिती स्वाब संस्थेच्या वतीने देण्यात आली.