26 पानांची सुसाईड नोट आणि शिक्षकाची पत्नी व दोन मुलांसह आत्महत्या

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
सोलापूर,
Four people suicide in Solapur सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील हत्तीज येथे एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून, एका कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या योगेश बाळासाहेब पाटील यांनी पत्नी आणि दोन मुलांना विष देऊन त्यानंतर स्वतः गळफास घेत जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.या घटनेत योगेश पाटील (वय सुमारे 40), त्यांची पत्नी माधुरी पाटील (37), मुलगा अथर्व (11) आणि शिवांश (9) यांचा मृत्यू झाला आहे. 
 
 

sd45456 
 
प्राथमिक तपासानुसार, योगेश पाटील हे नंदुरबार जिल्ह्यातील चौगाव बु. येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. शाळेला सुट्टी असल्याने ते काही दिवसांपूर्वी हत्तीज येथे आले होते. आर्थिक अडचणी आणि शेअर बाजारातील मोठ्या नुकसानीच्या तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.घरात प्रवेश केल्यानंतर पत्नी आणि दोन्ही मुले बेशुद्ध अवस्थेत आढळली, तर योगेश पाटील यांनी गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिस तपासादरम्यान घटनास्थळावरून तब्बल 26 पानांची सुसाईड नोट सापडली आहे. या पत्रात त्यांनी आपल्या भावनांचा उल्लेख करत “जग मला वाईट म्हणेल, पण मी माझ्या कुटुंबाला एकटे सोडू शकत नव्हतो” असे लिहिले असल्याचे समोर आले आहे. तसेच आर्थिक व्यवहार, शेअर बाजारातील नुकसान आणि वैयक्तिक चिंता यांचा उल्लेखही या पत्रात आढळला आहे. या प्रकरणात कोणालाही थेट जबाबदार धरले नसल्याची प्राथमिक माहिती आहे.घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून, संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून पुढील चौकशी सुरू आहे.