मोदी सरकारची १२ वर्षे : जनकल्याणाचा सुवर्ण प्रवास

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
पत्रपरिषदेत पालकमंत्री डॉ. भोयर यांची माहिती
 
वर्धा, 
guardian minister dr. pankaj bhoyar पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकारची यशस्वी १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या १२ वर्षांच्या कालखंडात राष्ट्र प्रथम आणि विकसित भारत या ध्येयाने प्रेरित होऊन भारताने विकास, सुशासन, पायाभूत सुविधा, सामाजिक कल्याण, डिजिटल परिवर्तन आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात ऐतिहासिक झेप घेतली असून मोदी सरकारची १२ वर्षे विकास, विश्वास आणि जनकल्याणाचा सुवर्ण प्रवास असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज शनिवार १३ रोजी स्थानिक भाजपा कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
 
 
pankaj
 
नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक सलग १२ वर्षे पंतप्रधान म्हणून कार्य करताना या काळात त्यांनी केलेल्या विकास कार्याच्या पृष्ठभूमीवर आयोजित पत्रपरिषदेत माहिती देताना ते बोलत होते. सन २०१४ ते २६ या कार्यकाळात भारताने जगासमोर एक नवा आत्मविश्वास, नवी अर्थव्यवस्था आणि नवा भारत उभा केला आहे. ग्रामीण रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, मेट्रो, विमानतळ, डिजिटल कनेटिव्हीटी आणि सिंचन खेत्रात अभूतपूर्व गुंतवणूक करण्यात आली. प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेंतर्गत लाखे किलोमीटर रस्त्यांची उभारणी झाली. राष्ट्रीय महामार्गांचे जाळे ९१ हजार किमीवरून १.४६ लाख किमीपेक्षा अधिक झाले आहे. कृषी क्षेत्रात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, पीक विमा योजना, पीएम-किसान यासारख्या योजनांमुळे शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न यशस्वी झाले. सूक्ष्म सिंचनाखाली १०९ लाख हेटरपेक्षा अधिक क्षेत्र आणण्यात आले असून देशाने अन्नधान्य आणि दूग्ध उत्पादनात विक्रमी कामगिरी नोंदविल्याचेही ना. भोयर यांनी यावेळी सांगितले.
 
 
डिजिटल भारत अभियानामुळे भारत जगातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट अर्थव्यवस्था बनला आहे. उत्पादन-संलग्न प्रोत्साहन, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि सेमीकंडटर मिशनमुळे भारत उत्पादन व तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत भारत आज संरक्षण उपकरणांचा प्रमुख निर्यातदार देश बनत आहे. स्वदेशी उत्पादन आणि संरक्षण नियोतीमध्ये विक्रमी वाढ झाली. १२ वर्षांच्या कार्यकाळात शेतकर्‍यांना तिनदा कर्जमाफी दिली. महसूल विभागाच्या माध्यमातूनही बळीराजा शेतकरी पांदण रस्ता ही योजना अंमलात आणली असल्याचेही ना. भोयर म्हणाले.
 
 
सामाजिक दायित्व म्हणून ५ जूनपासून भाजपाने जिल्ह्यातील प्रत्येक बूथवर २५ झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. तर २१ जून जागतिक योगदिनानिमित्त योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजनही करण्यात येणार आहे. विकासाच्या दृष्टीने प्रत्येक मंडळात संपर्क अभियान राबविणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष संजय गाते, आ. राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, माजी आमदार दादाराव केचे, सुनील गफाट, प्रदीप ठाकूर, कमलाकर निंभोरकर, अशोक कलोडी उपस्थित होते.