जोरहाट,
Indian Air Force aircraft crashes in Assam आसाममधील जोरहाट हवाई तळावर भारतीय हवाई दलाचे एएन-32 वाहतूक विमान कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. उतरण्याच्या प्रयत्नादरम्यान हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, घटनेनंतर परिसरात तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाचे अँटोनोव्ह एएन-३२ हे लष्करी सामान, सैनिक आणि अत्यावश्यक सामग्रीच्या वाहतुकीसाठी वापरले जाणारे महत्त्वाचे विमान आहे. दुर्गम भागातही उड्डाण करण्याच्या क्षमतेसाठी हे विमान ओळखले जाते. जोरहाट हवाई तळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना अचानक विमान नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेनंतर तातडीने हवाई दलाची बचाव पथके आणि अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अपघाताच्या ठिकाणी सुरक्षा कडेकोट करण्यात आली आहे आणि परिसर सील करण्यात आला आहे.या दुर्घटनेत जीवितहानी झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी भारतीय हवाई दलाने अद्याप अधिकृत पुष्टी केलेली नाही. अपघाताचे नेमके कारण काय होते याचा तपास सुरू करण्यात आला असून तांत्रिक बिघाड की इतर कारण, याचा शोध घेतला जात आहे.हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून लवकरच अधिकृत अहवाल जारी केला जाईल. या घटनेमुळे लष्करी वर्तुळात खळबळ उडाली आहे.