भारतीय जहाजावरील हल्ल्यावरून अमेरिका-इराणमध्ये तापले!

ट्रम्प यांच्या आरोपांवर इराणचा पलटवार

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
तेहरान,
Iran hits back at Trump's allegations होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील भारतीय जहाजांवरील कथित हल्ल्यांमुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा चिघळला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय खलाशांना घेऊन जाणाऱ्या जहाजांवर झालेल्या हल्ल्यांसाठी इराणला जबाबदार धरल्यानंतर तेहरानने या आरोपांचा तीव्र शब्दांत इन्कार केला आहे. भारतातील इराणी दूतावासाने सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ट्रम्प यांचे आरोप तथ्यहीन आणि दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे. भारतीय खलाशांच्या मृत्यूशी संबंधित घटनांवरून लक्ष हटवण्यासाठी हे आरोप करण्यात आल्याचा दावा इराणने केला आहे. दूतावासाच्या म्हणण्यानुसार, अलीकडील काळात भारतीय नागरिक असलेल्या जहाजांवरझालेल्या कारवायांसाठी अमेरिकाच जबाबदार आहे.
 
 
 Trump
 
 
इराणने असा आरोप केला की, अल्प कालावधीत भारतीय खलाशांना घेऊन जाणाऱ्या तीन जहाजांवर कारवाई करण्यात आली आणि त्यात काही भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनांमुळे संबंधित कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळल्याचे सांगत इराणने अमेरिकेच्या भूमिकेवर कठोर टीका केली आहे.दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ परिसरातील जहाजांवरील हल्ल्यांमध्ये इराणचा सहभाग असल्याचा दावा केला होता. भारतीय जहाजांना लक्ष्य करणे अस्वीकार्य असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणाकडे गंभीर सुरक्षाविषयक मुद्दा म्हणून पाहण्याची गरज व्यक्त केली होती. मात्र, त्यांच्या दाव्याला अद्याप स्वतंत्र पातळीवर पुष्टी मिळालेली नाही.
 
 
 
 
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानेही अमेरिकेवर निशाणा साधत सागरी सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कारवायांसाठी वॉशिंग्टनला जबाबदार धरले. या प्रकारांमुळे आंतरराष्ट्रीय जलमार्गांतील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे सांगत त्यांनी जागतिक समुदायाने या विषयाची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी केली. भारतीय खलाशांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे आखाती प्रदेशातील तणाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच संवेदनशील असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात या घडामोडींमुळे जागतिक व्यापार आणि सागरी सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे.