PM किसान ई-केवायसीसाठी 30 जून अंतिम मुदत; अन्यथा हप्ता बंद

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
मुंबई,
pm kisan e kyc प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. ही प्रक्रिया 30 जून 2026 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक असून, मुदतीत ई-केवायसी न करणाऱ्या लाभार्थ्यांचा पुढील हप्ता थांबवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये याबाबत जागरूकता वाढविण्यात येत आहे.
 
pm kisan e kyc
 
ही योजना 2019 पासून देशभरात राबवली जात असून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 22 हप्ते वितरित करण्यात आले असून 13 मार्च रोजी 22 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. आता 23 व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे, मात्र त्यासाठी ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे.
 
ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना जवळच्या सीएससी केंद्रावर (CSC Center) जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने प्रमाणीकरण करता येते. तसेच मोबाईलवरील पीएम किसान अ‍ॅपद्वारे चेहरा ओळख (Face Authentication) करूनही ही प्रक्रिया पूर्ण करता येते. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध, आजारी किंवा दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ग्रामस्तरीय अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचारी विशेष मदत करून ई-केवायसी पूर्ण करून देत आहेत. सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, वेळेत ई-केवायसी पूर्ण न झाल्यास पुढील आर्थिक हप्ता थांबू शकतो. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.