kamargaon Rural Hospital आरोग्य सेवा हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क मानला जातो. मात्र, कारंजा तालुयातील कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना मिळणार्या सुविधांची दयनीय अवस्था पाहता हा हक्कच धोयात आल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. रुग्णालयाच्या इमारतीचे काही महिन्यापूर्वी देशमुख नगर येथील बचत भवनात स्थलांतर करण्यात आले. मात्र, अपुरी जागा आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे रुग्णांना ओपीडीची चिठ्ठी काढण्यासाठी तसेच औषधे घेण्यासाठी भर उन्हात तप्त दगडांवर उभे राहण्याची वेळ येत आहे. गेल्या सहा महिन्यापासून वयोवृद्ध, गरोदर महिला, दिव्यांग तसेच सर्वसामान्य रुग्णांना जीव धोयात घालून या ठिकाणी उभे राहावे लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रुग्णालय परिसरात सुरक्षित पायाभूत सुविधा नसल्याने रुग्णांना मोठी कसरत करावी लागत असून, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि दिव्यांग व्यक्तींना याचा सर्वाधिक फटका बसत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठिकाणी योग्य रस्ता, पादचारी मार्ग किंवा सुरक्षित उभे राहण्याची व्यवस्था नसल्याने रुग्णांचा तोल जाऊन अपघात होण्याची शयता कायम आहे. अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे रुग्ण आणि नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत असून, एखादा गंभीर अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. एकीकडे शासन ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या उन्नतीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केल्याचा दावा करीत असताना दुसरीकडे कामरगावच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना सुरक्षितपणे उभे राहण्यासाठीही व्यवस्था नसल्याचे वास्तव समोर आले आहे. कामरगावसह परिसरातील सुमारे ४० गावांतील नागरिक या रुग्णालयावर अवलंबून आहेत. त्यामुळे रुग्णालय परिसरात तातडीने सावलीची व्यवस्था, सुरक्षित पायाभूत सुविधा, बसण्याची व्यवस्था आणि रुग्णाभिमुख सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन
कामरगाव ग्रामीण रुग्णालयात २०१२-१३ पासून कायमस्वरूपी अधीक्षक नाही. तीन वैद्यकीय अधिकार्यांची पदे मंजूर असतानाही अनेकदा एक-दोन अधिकार्यांवरच संपूर्ण रुग्णसेवेचा भार पडतो. त्यामुळे सामान्य आजारांसाठीही रुग्णांना अमरावती येथे रेफर करण्याची वेळ येते. जानेवारीपासून रुग्णालयाचे स्थलांतर बचत गटाच्या हॉलमध्ये करण्यात आले असून लाखो रुपये खर्च करूनही रुग्णांना दगडांचा आधार घेऊन नोंदणी व औषधे घ्यावी लागत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ सुविधा सुधाराव्यात, अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने उपोषण आंदोलन छेडल्या जाईल.