मुंबई
kap bashi movie आपल्या अनोख्या कथानकामुळे आणि आगळ्यावेगळ्या अटीमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘कप बशी’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. आई, मुलगा आणि होणारी सून यांच्या नात्याभोवती फिरणारी ही भावनिक आणि मनोरंजक कथा येत्या १९ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अभिनेता ऋषी मनोहर आणि अभिनेत्री पूजा सावंत यांची नवी जोडी या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
सुकल्प चित्रच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून कल्पक सदानंद जोशी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन्सचे निलेश रामगोपाल राठी यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चेतन सैंदाणे यांनी पटकथा आणि संवादलेखन केले असून वैभव रामकृष्ण चिंचाळकर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आधुनिक काळातील विवाहसंस्थेवर आधारित एक वेगळाच दृष्टिकोन पाहायला मिळतो. लग्न जुळविताना वधू-वरांची पत्रिका जुळविण्याची परंपरा सर्वपरिचित आहे. मात्र ‘कप बशी’मध्ये एक उच्चशिक्षित आणि रेडिओ जॉकी असलेली तरुणी होणाऱ्या नवऱ्याऐवजी त्याच्या आईशी पत्रिका जुळण्याची अट घालते. या अनोख्या अटीमुळे निर्माण होणारे विनोदी, भावनिक आणि नाट्यमय प्रसंग चित्रपटात उलगडणार आहेत. ट्रेलरमधून या कथानकातील वेगळेपणा आणि उत्सुकता स्पष्टपणे जाणवते.
चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत, पूजा सावंत, नवोदित अभिनेता ऋषी मनोहर, नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे, आनंद इंगळे, आनंद काळे, चिन्मय शिंत्रे आणि उमा सरदेशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कलाकारांच्या प्रभावी अभिनयासोबतच खुसखुशीत संवाद आणि कौटुंबिक नात्यांचे वास्तवदर्शी चित्रण ट्रेलरमधून पाहायला मिळते.
‘कप बशी’च्या निमित्ताने kap bashi movie मराठी चित्रपटसृष्टीला प्रथमच ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांचे संगीत लाभले आहे. गीतकार गुरु ठाकूर यांनी गीते लिहिली असून बाळू दहिफळे यांनी छायांकनाची जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटाचे संकलन आशिष म्हात्रे यांनी केले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते मंदार कमलापूरकर यांनी ध्वनी संयोजन, तर राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्रीकांत देसाई यांनी लूक डिझाइनचे काम केले आहे. याशिवाय दीपाली विचारे यांनी नृत्य दिग्दर्शन, महेश कुडाळकर यांनी कला दिग्दर्शन आणि चिन्मय शिंत्रे यांनी प्रोजेक्ट हेड म्हणून काम पाहिले आहे.चित्रपटाचे शीर्षक, कलाकारांची फळी आणि अनोखे कथानक यामुळे ‘कप बशी’ने आधीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली असून कौटुंबिक नात्यांना आधुनिक दृष्टिकोनातून मांडणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. १९ जून रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.