नवी दिल्ली,
Kohli's post makes fans emotional न्यूझीलंड क्रिकेटचा आधारस्तंभ मानला जाणारा केन विल्यमसन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रदीर्घ आणि यशस्वी प्रवासाला अखेर पूर्णविराम दिला आहे. तब्बल 16 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजी, नेतृत्व आणि शांत स्वभावाने छाप पाडणाऱ्या विल्यमसनच्या निवृत्तीने क्रिकेटविश्वात भावनिक वातावरण निर्माण झाले आहे. विल्यमसनच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने सोशल मीडियावर एक भावनिक संदेश शेअर करत आपल्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला. कोहलीने लिहिले की, अनेक वर्षे प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांविरुद्ध खेळल्यानंतर त्यांच्यात निर्माण झालेली मैत्री ही क्रिकेटमधील सर्वात मौल्यवान गोष्टींपैकी एक आहे. खेळाबद्दलचा समान दृष्टिकोन आणि जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक वृत्ती यामुळे हे नाते अधिक दृढ झाल्याचे त्याने नमूद केले.

2008 च्या युवा विश्वचषकादरम्यान सुरू झालेली दोघांची ओळख पुढे मैत्रीत बदलली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमध्ये अनेकदा एकमेकांविरुद्ध खेळताना दोघांनीही चाहत्यांना संस्मरणीय सामने दिले. मैदानावर स्पर्धा असली तरी मैदानाबाहेर दोघांमध्ये कायम आदराचे आणि मैत्रीचे संबंध राहिले.विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने जागतिक क्रिकेटमध्ये नवे स्थान निर्माण केले. त्याच्या कर्णधारपदात संघाने अनेक आयसीसी स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आणि जागतिक स्तरावर आपली ताकद सिद्ध केली. शांत, संयमी आणि रणनीतीपूर्ण नेतृत्वामुळे तो जगातील सर्वाधिक आदर मिळवणाऱ्या कर्णधारांपैकी एक ठरला.
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनीही विल्यमसनच्या कारकिर्दीचे कौतुक करत त्याच्या नेतृत्वगुणांची आणि खेळाप्रती असलेल्या निष्ठेची प्रशंसा केली. क्रिकेटमधील त्याचे योगदान दीर्घकाळ स्मरणात राहील, असे त्यांनी म्हटले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हजारो धावा, अनेक विक्रम आणि असंख्य संस्मरणीय खेळींची नोंद करणारा विल्यमसन न्यूझीलंडच्या महान क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून ओळखला जाईल. त्याच्या निवृत्तीमुळे एका युगाचा अंत झाल्याची भावना क्रिकेट चाहत्यांमध्ये व्यक्त होत आहे.