चेनुष्ठा परिसरात बिबट्याची दहशत

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
दोन बिबटे असल्याचा ग्रामस्थांचा दावा
वनविभागाची पाहणी सुरू
 
तिवसा, 
Leopard Terror तिवसा तालुक्यातील चेनुष्ठा परिसरात गेल्या महिनाभरापासून बिबट्याचा वाढता वावर नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे, परिसरात एक नव्हे तर दोन बिबटे मुक्तपणे फिरत असल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत असून, त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, महिला व शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून चेनुष्ठा येथील नाणीबाई ढोणे तसेच वसुले यांच्या शेताजवळ बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी आणि सायंकाळी ८ ते ९ वाजताच्या दरम्यान किंवा शेतात जाणार्‍या नागरिकांना, शेतमजुरांना तसेच गावाबाहेर जाणार्‍या येणार्‍या प्रवाशांना बिबट्या दिसल्याच्या घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
 
 
Leopard
 
या प्रकरणी नागरिकांनी वनविभागाकडे लेखी व तोंडी तक्रारी केल्या आहेत. तक्रारीची गंभीर दखल घेत वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी संबंधित परिसरात पाहणी करीत असून बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. बिबट्याचा वावर निश्चित झाल्यानंतर पुढील आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, कोणतीही अप्रिय घटना घडण्यापूर्वी वनविभागाने परिसरात पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. मानवी जीविताला धोका निर्माण होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. चेनुष्ठा परिसरातील बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे सध्या गावात दहशत असून वनविभागाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 

चेनुष्ठा परिसरातील नागरिकांकडून बिबट्याच्या वावराबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानुसार वनविभागाचे पथक संबंधित परिसरात सातत्याने पाहणी करीत असून बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. पुरावे संकलित करण्यासाठी व हालचालींचा मागोवा घेण्यासाठी परिसरात ट्रॅप कॅमेरे बसविण्यात येत आहेत.
- शीतल घुटे,
वनपरिक्षेत्र अधिकारी