राज्यमंत्री इंद्रनील नाईकांच्या पाठपुराव्याला यश
महसूल विभागाकडून कार्यवाहीला गती
पुसद,
Minister of State Indranil Naik यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रशासकीय सोयीसाठी महत्त्वपूर्ण ठरणाèया पुसद येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागणीची महसूल विभागाने दखल घेतली असून, कार्यालय निर्मितीच्या प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुसद परिसरातील नागरिकांना भविष्यात अनेक महसुली कामांसाठी यवतमाळपर्यंत धाव घेण्याची गरज भासणार नाही.
यवतमाळ जिल्हा राज्यातील भौगोलिकदृष्ट्या मोठ्या जिल्ह्यांपैकी एक असून येथे 16 तालुक्यांचा समावेश आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील पुसद, महागाव, उमरखेड, दिग्रस, आर्णी या तालुक्यांतील नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसाठी जिल्हा मुख्यालय गाठण्यासाठी मोठे अंतर पार करावे लागते. यामुळे नागरिकांचा वेळ आणि आर्थिक खर्च वाढत होता. ही बाब लक्षात घेऊन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पुसद येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याची मागणी सातत्याने शासनाकडे लावून धरली होती. त्यांच्या या पाठपुराव्याची दखल घेत महसूल व वन विभागाने 11 जून 2026 रोजी सर्व विभागांतील आयुक्तांना पत्र जारी केले.
या पत्रानुसार राज्यातील प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालय संदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रस्तावावर 15 दिवसांच्या आत हरकती व सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे पुसद येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्थापनेचा मार्ग मोकळा होत असल्याचे चित्र आहे. या कार्यालयामुळे पुसद उपविभागासह परिसरातील लाखो नागरिकांना महसूल, जमीन, प्रशासकीय आणि विविध शासकीय कामांसाठी स्थानिक स्तरावरच सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून प्रशासनही अधिक गतिमान आणि लोकाभिमुख होण्यास मदत मिळणार आहे. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पुसद परिसराच्या विकासाला आणखी एक महत्त्वपूर्ण बळ मिळणार असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. पुसद येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची स्थापना ही परिसराच्या प्रशासकीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.