मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
मुंबई,
Misuse of digital signature in Mumbai जिल्हाधिकारी कार्यालयात डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर बनावट प्रमाणपत्रे जारी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात गंभीर अनियमितता आढळल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ दखल घेत चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
 
 
 
Misuse of digital signature in Mumbai
 
तक्रारीनुसार, नायब तहसीलदारांच्या नावावर असलेल्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून अधिवास, उत्पन्न, ईडब्ल्यूए आणि वारसा प्रमाणपत्रांसह अनेक अधिकृत कागदपत्रे मोठ्या प्रमाणावर जारी करण्यात आली. या प्रकारामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्राथमिक चौकशीत 8 मे ते 5 जून 2026 या कालावधीत जारी करण्यात आलेल्या 1,023 प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 802 प्रमाणपत्रे नियमानुसार असल्याचे स्पष्ट झाले असून उर्वरित 221 प्रमाणपत्रांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसल्याचे निदर्शनास आले आहे.
 
 
या प्रकरणात उपजिल्हाधिकारी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता 2023 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत विविध गंभीर कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. सध्या एमआरए मार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक Yogesh Sable यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाचा संपूर्ण नेटवर्क उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.