आ. वानखडे यांनी व्यवस्थापनाला फटकारले
स्थानिकांना ८० टक्के रोजगार द्या
नांदगाव पेठ,
MLA Rajesh Wankhade नांदगाव पेठ पंचतारांकित एमआयडीसी परिसरातील रेमंड या नामांकित कापड निर्मिती कंपनीतील कामगारांच्या विविध समस्यांबाबत शनिवारी आ. राजेश वानखडे यांनी रेमंड व्यवस्थापनासोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. कामगारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय, मानसिक त्रास किंवा जाणीवपूर्वक दबाव आणण्याचे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा त्यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिला.
कामगारांनी दिलेल्या निवेदनात रेमंड व्यवस्थापनाकडून काही कामगारांना त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कामगार संघटनांच्या काही पदाधिकार्यांना हाताशी धरून कामगारांवर अन्याय केला जात असल्याची तक्रारही करण्यात आली. या पृष्ठभूमीवर आमदार वानखडे यांनी कंपनी अधिकार्यांशी चर्चा करत कामगारांचे प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना दिल्या. यावेळी आमदार राजेश वानखडे म्हणाले की, कामगारांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न केल्यास कामगार कायद्यानुसार कंपनी व्यवस्थापनाला जबाबदार धरले जाईल. स्थानिक कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे. कंपनीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देत ८० टक्के रोजगार स्थानिक युवकांना मिळाला पाहिजे, अन्यथा संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशाराही आ. वानखडे यांनी दिला.
रेमंडसह एमआयडीसीतील अनेक कंपन्यांमध्ये स्थानिक कामगारांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी समोर येत असून, स्थानिकांना रोजगाराच्या संधी आणि योग्य वागणूक मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीदरम्यान आमदारांनी कंपनी व्यवस्थापनातील अधिकार्यांची कानउघाडणी करत कामगारांच्या समस्या गांभीर्याने घेण्याचे निर्देश दिले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक गुल्हाने, तिवसा नगरपंचायतीचे नगरसेवक प्रकाश पडोळे, कंपनी हेड विकास राजा,एचआर गणेश शिंदे, यांच्यासह संबंधित अधिकारी,कामगार आणि पदाधिकारी उपस्थित होते.