हैदराबाद,
Murder of YouTuber Masood Chandi हैदराबादमधील गोलकोंडा परिसरात युट्युबर आणि फिटनेस कंटेंट क्रिएटर मसूद चंडी, ज्यांना शेख मेहबूब म्हणूनही ओळखले जाते, यांची त्यांच्या राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही हल्लेखोर अचानक घरात घुसले आणि लोखंडी सळ्या तसेच धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने मसूद चंडी यांचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.

पोलिस तपासात ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचे समोर येत आहे. मुख्य आरोपी म्हणून शेख सोहेल याचे नाव पुढे आले आहे, जो मृत व्यक्तीच्या पत्नीचा भाऊ असल्याचे सांगितले जाते. त्याच्यासोबत दोन साथीदार अफू आणि जाबिरही या हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय आहे.पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, सोहेल आणि मसूद यांच्यात मागील काही काळापासून कौटुंबिक वाद सुरू होते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या कौटुंबिक तणावानंतर परिस्थिती अधिक बिघडल्याचे सांगितले जाते. या वादातूनच ही हत्या घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून सर्व आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.