बांगलादेशी क्रिकेटपटूला पोलिसांचा 'स्पेल’!

नयिम हसनचा धक्कादायक दावा

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
ढाका,
Nayeem Hasan's shocking claim बांगलादेश क्रिकेट संघाचा युवा फिरकीपटू नयिम हसन याने पोलिसांकडून कथित मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी संघात निवड झालेल्या नयिमसोबत ही घटना त्याच्या मूळ गावी चित्तगोंग येथे घडल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणानंतर बांगलादेशच्या क्रीडा वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून पोलिस प्रशासनानेही चौकशीचे आदेश दिले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, प्रीमियर लीगमधील सामना संपल्यानंतर नयिम हसन घरी परतत होता. विमान उशिरा पोहोचल्यामुळे त्याने विमानतळावरून सीएनजी रिक्षाने प्रवास सुरू केला. रात्री उशिरा काही पोलिसांनी त्याचे वाहन थांबवून तपासणी केली. नयिमच्या म्हणण्यानुसार, त्याने चौकशीदरम्यान पूर्ण सहकार्य केले होते. मात्र, त्यानंतर पोलिसांनी त्याच्याशी गैरवर्तन करत त्याला जबरदस्तीने दुसऱ्या वाहनात बसवले.नयिमने दावा केला आहे की, पोलीस ठाण्यात नेल्यानंतर त्याला शिवीगाळ करण्यात आली आणि काठ्या तसेच प्लास्टिकच्या पाईपने मारहाण करण्यात आली. स्वतःची ओळख क्रिकेटपटू म्हणून सांगूनही संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नसल्याचे त्याने म्हटले आहे. या घटनेमुळे तो मानसिकदृष्ट्याही हादरल्याचे समजते.
 
 

bang
 
दरम्यान, चित्तगोंग महानगर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या आरोपांची गंभीर दखल घेत चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीत कोणताही अधिकारी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिस प्रशासनाने दिले आहे. २६ वर्षीय नयिम हसन हा बांगलादेशच्या कसोटी संघातील महत्त्वाचा गोलंदाज मानला जातो. त्याने आतापर्यंत १४ कसोटी सामन्यांत ४८ बळी घेतले आहेत. आगामी झिम्बाब्वे दौऱ्यापूर्वी घडलेल्या या घटनेमुळे क्रिकेट विश्वात आश्चर्य व्यक्त केले जात असून चौकशीच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.