वर्दळीच्या ठिकाणची घटना
यवतमाळ,
Nurse murdered in hospital यवतमाळच्या अवधूतवाडीतील एका रुग्णालयात परिचारिकेची भरदिवसा धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना शनिवार, 13 जून रोजी भरदुपारी 4.30 च्या दरम्यान घडली. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पोलिस सूत्रांनुसार कुसुम चांदेकर (वय 45) असे मृत महिलेचे नाव आहे. ती येथील ख्यातनाम जुन्या श्रोत्री हॉस्पिटल आणि सध्याच्या डॉ. रजनी कांबळे यांच्या सुतिकागृहात परिचारिका म्हणून कार्यरत होती. आरोपीने शनिवारी दुपारी थेट रुग्णालयात घुसून तिच्यावर वार केले. घाव वर्मी लागल्याने ती महिला रुग्णालयाच्या व्हरांड्यात कोसळली.
यावेळी पूर्ण व्हरांडा रक्ताच्या थारोळ्याने लाल झाला होता. नागरिकांचीही घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. अवधूतवाडी पोलिस पोहोचले त्यावेळी मारेकरी घटनास्थळावरून पळून गेला होता. पोलिसांनी या परिचारिकेला रुग्णालयात नेले तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली. उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने, अवधूतवाडी पोलिस ठाणेदार अजित कदम व डीबी पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. परंतु कोणत्या उद्देशाने हत्या, मारेकरी किती व कोण, नेमके कारण काय, या प्रश्नाची उत्तरे पोलिस तपासानंतरच पुढे येतील.