नागपूर,
online storytelling competition श्री गजानन महाराज अध्ययन केंद्र, नागपूर यांच्या वतीने जागतिक स्तरावरील ऑनलाइन दृकश्राव्य कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चार ते नऊ वर्षे आणि दहा ते पंधरा वर्षे अशा दोन वयोगटांमध्ये आयोजित या स्पर्धेला देश-विदेशातील बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेसाठी १०० हून अधिक बालकांनी नोंदणी केली होती. स्पर्धकांनी दृकश्राव्य माध्यमातून कथाकथन सादर केले. उत्कृष्ट सादरीकरण, कथनशैली, अभिव्यक्ती आणि सर्जनशीलता या निकषांच्या आधारे परीक्षकांनी विजेत्यांची निवड केली.
चार ते नऊ वर्षे वयोगटात पायस दीपिका विवेक पाठक यांनी प्रथम क्रमांक, श्रेयस निलेश बर्वे यांनी द्वितीय क्रमांक, तर स्वरदा अमित दिवे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ पुरस्कार राघव किरण पोतदार आणि ईशा अमोल फुटे यांना प्रदान करण्यात आला. दहा ते पंधरा वर्षे वयोगटात कार्तिकी निलेश कपलें यांनी प्रथम क्रमांक मिळविला. दिवीजा विशाल घरोटे यांनी द्वितीय, तर स्पृहा निलेश सबनीस यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. या गटातील उत्तेजनार्थ पुरस्कार सई संदीप आंबेकर आणि अस्मि तुषार जोशी यांना देण्यात आला.
विजेत्यांना अनुक्रमे प्रथम क्रमांकासाठी ३,००० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २,००० रुपये, तृतीय क्रमांकासाठी १,००० रुपये तसेच उत्तेजनार्थ पुरस्कारासाठी प्रत्येकी ५०० रुपये रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सुरेखा देशपांडे, रश्मी भालेराव आणि श्रीलेखा देवरस यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच ॲब्रीज मीडिया सर्व्हिसेसचे निलय देशपांडे यांच्या तांत्रिक सहकार्यामुळे आणि ऑनलाइन व्यवस्थापनाच्या प्रभावी नियोजनामुळे स्पर्धा सुरळीत व यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेतील सर्व विजेते आणि सहभागी बालकांचे श्री गजानन महाराज अध्ययन केंद्रातर्फे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
सौजन्य: भालचंद्र देशपांडे, संपर्क मित्र