पंढरपूर,
Pandharpur temple closed for two days पंढरपूरमधील विठ्ठल भक्तांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली असून 22 ते 24 जून या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे की या काळात भाविकांनी पंढरपूरला येऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर सुरू असलेल्या नैसर्गिक झीज रोखण्यासाठी आणि तिचे संवर्धन करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग आणि राज्य पुरातत्त्व विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लेपन प्रक्रिया राबवली जाणार आहे. याच कारणामुळे 23 आणि 24 जून रोजी मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.

या संवर्धन प्रक्रियेत मूर्तीच्या झिजलेल्या भागांवर पारंपरिक दगडाची पावडर आणि विशेष सेंद्रिय रसायनांच्या मिश्रणाने संरक्षक थर दिला जाणार आहे. विठ्ठल मूर्तीच्या पायासह काही भागांमध्ये झालेली झीज दुरुस्त करून तिचे आयुष्य वाढवण्याचा या प्रक्रियेचा उद्देश आहे.मंदिर समिती, वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी आणि पुरातत्त्व विभाग यांच्यात झालेल्या बैठकीनंतर या कामासाठी 22 ते 24 जून या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. यापूर्वी 1988, 2005, 2012 आणि 2020 मध्येही अशा प्रकारचे संवर्धन करण्यात आले होते. या प्रक्रियेची अंमलबजावणी अत्यंत काळजीपूर्वक आणि तांत्रिक पद्धतीने केली जाणार असून मूर्तीची पवित्रता आणि सुरक्षितता अबाधित राहील याची पूर्ण खबरदारी घेतली जाणार आहे. त्यामुळे दोन दिवस मंदिर बंद राहणार असून भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.