निवृत्तीच्याच दिवशी पोलिस कर्मचाऱ्याला मिळणार सर्वच लाभ

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
- पोलिस मुख्यालयाकडून प्रयत्न सरु

अनिल कांबळे
नागपूर, 
police retirement benefits पोलिसांच्या सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन किंवा अन्य लाभ मिळविण्यासाठी पोलिस आयुक्त कार्यालयाच्या चकरा माराव्या लागू नये, यासाठी पोलिस मुख्यालयाच्यावतीने पोलिस कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशीच सर्वच लाभ देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिस खात्यातून सेवानिवृत्त होताना मनात समाधान आणि चेहऱ्यावर हास्य घेऊन पोलिस कर्मचारी घराकडे कुटुंबीयांसह परततील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
police
 
शहर पोलिस दलात जवळपास ३२ ते ३५ वर्षे विविध पदावर आणि वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये सेवा दिल्यानंतर सेवानिवृत्तीचा भावनिक क्षण येत असतो. अंगावर वर्दी चढवून आतापर्यंत केलेल्या प्रामाणिक सेवेचे अवलोकन करण्याचा दिवस असतो. पोलिस विभागाला दिलेल्या सेवेतून सकारात्मक क्षण वेचण्याची वेळ असते. सेवानिवृत्त झाल्यानंतर पोलिस विभागाकडून निवृत्तीवेतन, वैद्यकीय सेवा किंवा अन्य लाभ विनासायास मिळावे, ही रास्त अपेक्षा प्रत्येक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पोलिस कर्मचाऱ्यांना लाभ मिळविण्यासाठी पोलिस आयुक्त कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत होत्या. त्यामुळे अनेक पोलिस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय त्रस्त होत होते. त्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र, पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी मुख्यालयाची कमान सांभाळताच सर्वप्रथम सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांना अगदी सेवानिवृत्तीच्या दिवशी सर्वच लाभ देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. त्यासाठी काही महिन्यांत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करुन त्यांची सर्व्हिस शीट, रिवॉर्डस, वैद्यकीय कागदपत्रे आणि लाभाचे प्रमाणपत्रे इत्यादी तयार करणे सुरु केले आहे. त्यामुळे सेवानिवृत्तीच्या दिवशी पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांच्या हातात सर्व लाभ आणि धनादेश देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पोलिस मुख्यलायच्या या उपक्रमामुळे प्रत्येक पोलिस कर्मचारी आनंदीत आणि स्वाभिमानाने सेवानिवृत्तीला स्विकारणार आहे.
 
पेंडिंग्स फाईल निकाली निघणार
अनेक पोलिस कर्मचाऱ्यांची प्रकरणे पोलिस मुख्यालयात प्रलंबित असतात. वेळेअभावी ती प्रकरणे किंवा फाईल्स अडकलेल्या असतात. मात्र, आता नव्याने रुजू झालेल्या पोलिस उपायुक्तांनी प्रलंबित फाईल्सचा गठ्ठा काढून ती प्रकरणे वेळेवर निकाली काढण्याची तयारी केली आहे. प्रलंबित करणाचा निपटारा करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.
 
 
कर्मचाऱ्यांच्या बदल्या आठवड्याभरात
एकाच ठिकाणी सेवा बजावल्यानंतर कार्यकाळ संपलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या सर्वसामान्य बदल्या येत्या ५ ते ६ दिवसांत करण्यात येणार आहेत. नव्या दमाच्या पोलिस कर्मचाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत. तसेच अनुभवी पोलिस कर्मचाऱ्यांच्या ज्ञानाचा फायदा व्हावा म्हणून त्यांना वेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात येणार आहे. मुदतवाढ मागणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची गरज आणि स्थिती याचा विचार करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यालयातून समोर आली आहे.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे सर्वच लाभ शेवटच्या दिवशी देण्यात येण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करणे आणि मनुष्यबळाचे योग्य नियोजन करण्याचे काम सध्या सुरु आहे.
- राहुल माकणीकर, पोलिस उपायुक्त (पोलिस मुख्यालय)