प्राजक्ताच्या गळी 'टॉलीवूड'ची माळ

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
मुंबई,
prajakta's mali in tollywood मराठी मालिका, चित्रपट आणि रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी आता आपल्या कारकिर्दीतील नव्या पर्वाची सुरुवात करण्यासाठी सज्ज झाली आहे. मराठी मनोरंजनसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर प्राजक्ता आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ती लवकरच एका तेलुगू चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे वृत्त आहे.अभिनय, सूत्रसंचालन आणि विविध दर्जेदार भूमिकांमुळे प्राजक्ताने गेल्या काही वर्षांत स्वतःची वेगळी छाप निर्माण केली आहे. छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आणि ओटीटी प्लॅटफॉर्मपर्यंत तिने आपल्या अभिनयाची ताकद सिद्ध केली आहे. आता मराठीनंतर दक्षिणेतील प्रेक्षकांनाही आपल्या अभिनयाची झलक दाखवण्यासाठी ती सज्ज झाली आहे.
 
 

prajakta 
मिळालेल्या माहितीनुसार, प्राजक्ताचा आगामी तेलुगू चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र, या चित्रपटाचे नाव, कथानक, तिची भूमिका आणि तिच्यासोबत कोणते कलाकार दिसणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. प्राजक्ताच्या या नव्या प्रवासामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून मराठी अभिनेत्री दक्षिणेतही आपली वेगळी ओळख निर्माण करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तिचा हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.