सेलू,
prajwal bhingare महाराष्ट्र पोलिस अकॅडमी येथे ९ जून रोजी पार पडलेल्या प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक सत्र क्रमांक १२७ च्या भव्य दीक्षांत संचलन सोहळ्यात सेलू येथील सुपूत्र प्रज्वल भिंगारे यांनी यशस्वी सहभाग नोंदवत पोलिस उपनिरीक्षक पदाच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा गाठला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) २०२२ च्या स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत प्रज्वल भिंगारे यांनी पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड मिळवली होती. त्यानंतर महाराष्ट्र पोलिस अकॅडमीत वर्षभर चाललेल्या कठोर आणि आव्हानात्मक प्रशिक्षणामध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. या प्रशिक्षणादरम्यान भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम, स्थानिक व विशेष कायदे, फॉरेन्सिक विज्ञान, सायबर गुन्हे तपास, गुन्हेशास्त्र आदी विषयांचे सखोल ज्ञान देण्यात आले. याशिवाय शारीरिक कवायत, गोळीबार सराव आणि योग प्रशिक्षण यांचाही समावेश होता. या सर्व क्षेत्रांत प्रज्वल यांनी समर्पण, शिस्त आणि चिकाटीचे दर्शन घडवले.
दीक्षांत संचलन सोहळ्यास महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक सदानंद दाते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष म्हणजे या सोहळ्यातील ‘स्टार ओपनिंग सेरेमनी’चा सन्मान प्रज्वल भिंगारे यांच्या पालकांना मिळाला. हा क्षण भिंगारे कुटुंबासाठी अभिमानाचा आणि भावनिक ठरला. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रज्वल भिंगारे यांची परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक म्हणून गडचिरोली परिक्षेत्रात नियुती करण्यात आली आहे. समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कर्तव्यदक्ष, निष्ठावान आणि जनतेसाठी तत्पर पोलिस अधिकारी बनण्याचा त्यांचा निर्धार आहे. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील, भाऊ, आजोबा तसेच शिक्षकवृंद यांच्या मार्गदर्शनाला दिले आहे.