मुंबई
pranit more controversy कॉमेडी कार्यक्रमातील काही आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे निर्माण झालेला वाद आता अधिकच गंभीर स्वरूप धारण करत असून, यामध्ये कॉमेडियन प्रणित मोरे, हिमांशू जांगडा आणि डॉ. सेजल पवार हे तिघेही अडचणीत सापडले आहेत. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र सायबर पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रकरणाची सुरुवात एका कॉमेडी शोदरम्यान झालेल्या संवादातून झाली. या कार्यक्रमात सहभागी असलेल्या हिमांशू जांगडाने डेटिंगच्या अनुभवाबाबत बोलताना ३७० रुपयांच्या बिर्याणीचा संदर्भ देत एक विधान केले होते. त्याच्या वक्तव्यातून महिलेकडून अपेक्षित वागणुकीबाबत अप्रत्यक्ष सूचकता व्यक्त झाल्याचा आरोप करण्यात आला. या वेळी कार्यक्रमात उपस्थित असलेले प्रणित मोरे आणि इतरांनी हसून प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. या व्हिडीओमुळे समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून संबंधित वक्तव्यावर जोरदार टीका झाली आहे.या घटनेनंतर हिमांशू जांगडाला नोकरी गमवावी लागल्याचे समोर आले असून, राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. वाढत्या दबावानंतर महाराष्ट्र सायबर सेलने तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रणित मोरे यांनी आपले इन्स्टाग्राम खाते डिलिट केले होते. मात्र काही दिवसांनंतर त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत जाहीर माफी मागितली आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटले आहे की, कार्यक्रमादरम्यान समोरच्या वक्तव्यावर त्यांनी भावनेच्या भरात प्रतिक्रिया दिली आणि आक्षेपार्ह विधान थांबवण्यात ते अपयशी ठरले. याबद्दल त्यांनी खेद व्यक्त करत सर्व संबंधितांची माफी मागितली आहे.
प्रणित मोरे यांनी पुढे सांगितले की, ते कायदेशीर प्रक्रियेला सहकार्य करत असून भविष्यात आपल्या कंटेंटमध्ये अधिक जबाबदारीने काम करण्याचा प्रयत्न करतील. “चूक सुधारण्यासाठी मला संधी मिळावी,” अशी विनंतीही त्यांनी या माफीनाम्यातून केली आहे.दुसरीकडे, डॉ. सेजल पवार यांच्या वक्तव्यावरही स्वतंत्र वाद निर्माण झाला आहे. संबंधित कॉमेडी शोमध्ये त्यांनी वैद्यकीय शिक्षणादरम्यान शवविच्छेदनाशी संबंधित अनुभव सांगताना केलेल्या काही टिप्पणींवर आक्षेप घेण्यात आला आहे. या वक्तव्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला असून, सायबर सेलने त्यांनाही चौकशीसाठी बोलावले आहे.डॉ. पवार यांनी लेखी स्वरूपात माफी मागितल्याची माहिती समोर आली असून, त्यांच्या वक्तव्यामुळे गैरसमज निर्माण झाल्याचे त्यांनी मान्य केले आहे. या प्रकरणावर कॉलेज प्रशासनाकडूनही पुढील शिस्तभंगात्मक कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या संपूर्ण प्रकरणामुळे कॉमेडी शोमधील भाष्याची मर्यादा, सोशल मीडियावर होणारा प्रसार आणि सार्वजनिक प्रतिक्रियेचे परिणाम यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पोलिस तपास सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.