रायगड,
Raigad News रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातून एक अत्यंत अंगावर काटा आणणारी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका आईने स्वतः विष प्राशन करण्यापूर्वी आपल्या चार लहान मुलांना थंडपेयातून विष दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या घटनेत आईसह दोन मुलांचा मृत्यू झाला असून दोन मुलांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना मणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडीत घडली. आशा जाधव (वय 29) असे आत्मघातकी पाऊल उचलणाऱ्या महिलेचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, आशा जाधव यांनी आपल्या चार मुलांना थंडपेयातून विष दिले आणि त्यानंतर स्वतःही विष प्राशन करून जीवन संपवले. या घटनेत नंदिनी जाधव (वय 7) आणि दुर्वा जाधव (वय 6) या दोन मुलींचा मृत्यू झाला असून आई आशा जाधव यांचाही मृत्यू झाला आहे.

घरातील इतर दोन मुले सुदैवाने वाचली असली तरी त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत दोन्ही मुलांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घरगुती वाद, आर्थिक ताण किंवा इतर कोणतेही कारण यामागे असू शकते का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. माणगाव पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून सखोल चौकशी केली जात आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.