नवी दिल्ली,
Rajnath Singh's tough stance दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानविरोधात भारताने कठोर भूमिका घेतली आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सिंधू नदीच्या पाण्याबाबत पाकिस्तानला कठोर इशारा देत, भारताचे पाणी दहशतवादाला पाठबळ देणाऱ्यांपर्यंत पोहोचू दिले जाणार नाही, असे स्पष्ट सांगितले आहे. तेलंगणातील कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह यांनी केंद्र सरकारची दहशतवादाविरोधातील भूमिका अधोरेखित केली.

राजनाथ सिंह म्हणाले की, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे जगाला आपली ताकद आणि निर्धार दाखवून दिला आहे. शांततेची भाषा न समजणाऱ्यांना योग्य पद्धतीने उत्तर देण्याची क्षमता भारताकडे असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी या कारवाईवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधी पक्षांवरही टीका केली आणि देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या जवानांच्या शौर्यावर संशय घेणे योग्य नसल्याचे सांगितले.पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी कराराबाबत कठोर भूमिका घेतल्याची आठवण करून देत त्यांनी म्हटले की, ज्यांनी निरपराध नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू आणले, त्यांच्यासाठी भारताकडून पाण्याची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यांविरोधात सर्व पर्याय खुले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भारत जागतिक स्तरावर विश्वासार्ह आणि जबाबदार राष्ट्र म्हणून उदयास येत असल्याचा दावा करताना त्यांनी कोविड काळात अनेक देशांना दिलेल्या मदतीचा उल्लेख केला. मात्र, भारत केवळ मदतीपुरताच मर्यादित नसून आवश्यक तेव्हा कठोर प्रत्युत्तर देण्याची क्षमता देखील ठेवतो, असे सांगत त्यांनी ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा उल्लेख केला.यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी सातत्याने काम करण्याऐवजी योग्य वेळेची वाट पाहण्याची मानसिकता काही नेत्यांमध्ये असल्याची टीका त्यांनी केली. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकारण विकास आणि राष्ट्रहितावर आधारित असल्याचेही ते म्हणाले. देशाच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार प्रत्येक रुपयाचा योग्य वापर करत असल्याचा दावा करताना राजनाथ सिंह यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप नसल्याचे सांगितले. पुढील निवडणुकीपेक्षा पुढील पिढीच्या भवितव्याची चिंता सरकारला अधिक असल्याचे नमूद करत त्यांनी राष्ट्रनिर्मिती आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले.