सहा महिलांसह एका ऑटो चालक आरोपीला अटक
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अकोला:
robbery gang busted ऑटो रिक्षा प्रवासादरम्यान महिलांच्या पर्समधून दागिने आणि रोकड चोरणाऱ्या यवतमाळच्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी १ ऑटो चालकासह ६ महिला आरोपींना शनिवार, १३ रोजी अटक केली असून चोरीची रोकड, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेला ऑटो असा एकूण २ लाख ७३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.आरोपींवर शहरातील विविध पोलीस स्टेशन मध्ये चार गुन्ह्याची नोंद आहे.
प्राप्त माहितीनुसार, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, यवतमाळची एक टोळी ऑटोने अकोला शहरात चोरूनकरण्याच्या उद्देशाने फिरत आहे.त्या आधारे एलसीबीच्या पथकाने दोन पंच आणि महिला अंमलदारांसह खडकी चौक येथे नाकाबंदी केली. दरम्यान, यवतमाळ पासिंगचा एक संशयास्पद ऑटो एम.एच 29 बिडी 2746 भरधाव वेगाने काही महिलांना घेऊन जाताना दिसला. पोलिसांनी हात दाखवून ऑटो थांबवण्याचा इशारा केला असता, चालकाने ऑटो न थांबवता पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्परतेने पाठलाग करून ऑटोला रस्त्याच्या कडेला घेरले आणि थांबवुन अॅटोतील आरोपी सिद्धार्थ अर्जुन उपाळे (अॅटो चालक), भारती युवराज सकट, बानुबाई मोहन नाडे,मैना विजेंद्र उफाळे, राधा रकीरामा सकट, खुशबू प्रेम सकट, काजल राजा हतागळे सर्व रा.नेताजी नगर, दारव्हा रोड, यवतमाळ यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयांची कबुली दिली असून आरोपींना मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिस स्टेशन सिटी कोतवाली यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.कारवाई पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख नितीन लेव्हरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश देशमुख, गोपाल जाधव, पोलिस उपनिरीक्षक माजीद पठाण, पोलीस अमंलदार शेख हसन, अब्दुल माजीद, रवि खंडारे, किशोर सोनोने, मंगेश इंगळे, वसीमोद्दीन, एजाज अहमद, श्रीकांत पातोंड, अमोल दिपके, अशोक सोनवणे, पवन डंबेलकर, मनिष ठाकरे, तसेच महिला अंमलदार तुळसा दुबे, भारती ठाकुर यांनी पार पाडली.
चार गुन्ह्यांची नोंद आरोपींकडून चोरीची कबुली
३१ मे २०२६ रोजी अशोक वाटिका ते गांधी रोड दरम्यान ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिला फिर्यादीच्या बॅगमधून सोन्याचे दागिने चोरले होते. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.अशाच पद्धतीने आणखी तीन गुन्हे उघड झाले असून ज्याबाबत सिटी कोतवाली, रामदासपेठ खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
अकोला पोलिसांतर्फे सर्व नागरिक, विशेषतः महिला प्रवाशांना आवाहन करण्यात येते की, ऑटो किंवा गर्दीच्या ठिकाणी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तू व दागिन्यांची काळजी घ्यावी. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.