मुंबई
Rohit Pawar राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेतील एका अटीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची सरसकट माफी देण्यात येत आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास उर्वरित रक्कम एकरकमी भरावी लागणार असल्याची अट ठेवण्यात आली आहे. या अटीला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदाररोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
ही अट म्हणजे प्रत्यक्षात कर्जमाफी नसून वसुली असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला असून, ती तातडीने रद्द करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या आंदोलनाला काही शेतकरी संघटनांचा पाठिंबा मिळत असल्याचेही समोर येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अजित नवले यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी या आंदोलनावर तीव्र टीका करत जोरदार पलटवार केला आहे. रोहित पवार यांना केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी, टीआरपीसाठी आंदोलनाचा आधार घ्यायचा असतो, असा आरोप त्यांनी केला. आंदोलनाला फारसा अर्थ नाही आणि जनतेसमोर हे “नाटक” स्पष्ट होत असल्याचेही महाजन यांनी म्हटले आहे.
महाजन यांनी पुढे बोलताना Rohit Pawar सरकारने कर्जमाफी प्रामाणिकपणे राबवली असून, त्याचा लाभ मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना मिळणार असल्याचा दावा केला. तसेच यापूर्वीही विविध आंदोलनांवर आपण दीर्घकाळ उपोषण केले असल्याचे सांगत, रोहित पवार यांच्या आंदोलनाची तुलना करणे योग्य नसल्याचे त्यांनी सूचित केले.या वादात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून दिलासा मिळाल्याचेही महाजन यांनी नमूद केले. कांद्याला सध्या चांगला भाव मिळत असून शेतकरी वर्ग आनंदी असल्याचा दावा त्यांनी केला.सरकार आणि विरोधकांमध्ये कर्जमाफीच्या अटीवरून निर्माण झालेला हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, पुढील काळात या मुद्द्यावर राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.