पंढरपुरात उपोषणाचा सूर

रोहित पवारांचा ‘सातबारा कोरा’चा हट्ट कायम

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
पंढरपुर
rohit pawar सरसकट कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. विठ्ठलाच्या पवित्र नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या या आंदोलनामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
 
 

rohit pawar  
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भातील शासन निर्णयातील काही अटी अन्यायकारक असल्याचा आरोप करत, त्या मागे घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे. आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती काहीशी खालावल्याचे समोर आले असून डॉक्टरांनी रक्तदाब नियंत्रणात असल्याचे, मात्र रक्तातील साखर कमी झाल्याचे सांगितले असल्याची माहिती त्यांनी दिली.दरम्यान, राज्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी रोहित पवार यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. मात्र, मागण्यांवर ठोस विचार न झाल्यास चर्चेला अर्थ नाही, अशी भूमिका घेत त्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
 
 
या आंदोलनातून सरकारवर rohit pawar  टीका करताना रोहित पवार यांनी २०१९ च्या कर्जमाफी योजनेचा उल्लेख केला. त्या योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा केवळ ५० हजार रुपयांपर्यंत मर्यादित दिलासा देणे म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप त्यांनी केला. “सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही अपूर्ण आणि दिशाभूल करणारी आहे,” अशी टीका त्यांनी केली. तसेच, पूर्वीच्या योजनेशी तुलना करत ही कर्जमाफी ‘अर्धवट आणि अपुरी’ असल्याचे ते म्हणाले.राजकीय टीका-प्रत्युत्तरही या आंदोलनामुळे तीव्र झाले आहे. राज्य सरकारमधील मंत्री जयकुमार गोरे यांनी या आंदोलनावर टीका करत याला “नौटंकी” असे संबोधले होते. त्यावर रोहित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया देत सरकार आणि मंत्र्यांवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. तसेच, “शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नौटंकी म्हणणाऱ्यांना शेतकऱ्यांशी काही देणे-घेणे नाही,” असा पलटवार त्यांनी केला.आगामी भूमिकेबाबत बोलताना रोहित पवार यांनी सरकारला उद्या अल्टिमेटम देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. “आज नाही, पण उद्या सरकारला स्पष्ट इशारा देणार,” असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघेपर्यंत माघार घेणार नसल्याचेही त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.या आंदोलनामुळे राज्यातील कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून, सरकार आणि विरोधक यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. पुढील काही दिवसांत सरकार या प्रकरणावर कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.