पावसाळ्यातील संभाव्य अडचणी टाळण्यासाठी अभियंत्यांना निर्देश
हिंगणघाट,
sameer kunawar पावसाळ्याच्या पृष्ठभूमीवर हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुयातील वीज व्यवस्थेची सज्जता, विविध विकासकामांचा आढावा आणि नागरिकांना अखंड व सुरळीत वीजपुरवठा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे अभियंते, उपअभियंते व सहाय्यक अभियंत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आ. समीर कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली घेतली. यावेळी त्यांनी पावसाळ्यातील संभाव्य अडचणी टाळण्यासाठी अभियंत्यांना दिशानिर्देश दिले.
बैठकीदरम्यान वीजपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजनांचा आढावा घेतला. नवीन सबस्टेशन उभारणी, वाढत्या वीज मागणीच्या अनुषंगाने ट्रान्सफॉर्मर क्षमतेत वाढ, देखभाल व दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करणे तसेच पावसाळ्यात उद्भवणार्या संभाव्य तांत्रिक अडचणींना तातडीने सामोरे जाण्यासाठी आवश्यक नियोजनावर विशेष भर देण्यात आला. मुसळधार पाऊस व जोरदार वार्यामुळे झाडे कोसळून विद्युत पोल व वीजवाहिन्यांचे नुकसान होण्याची शयता लक्षात घेता, अशा घटनांमध्ये तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, साहित्य व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना आ. समीर कुणावार यांनी दिल्या. तसेच संवेदनशील ठिकाणांची पूर्वतयारी करून संभाव्य अडचणी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यावरही भर देण्यात आला.
यावेळी नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत वीज समस्यांचा सामना करावा लागू नये, तक्रारींचे त्वरित व प्रभावी निराकरण व्हावे तसेच वीज विभागाची यंत्रणा अधिक जबाबदारीने व तत्परतेने कार्यरत राहावी, यासाठी आ. कुणावार यांनी निर्देश दिले. बैठकीला हिंगणघाट व समुद्रपूर तालुयातील शहरी तसेच ग्रामीणचे सर्व अभियंते, उपअभियंते, सहाय्यक अभियंते उपस्थित होते.