पुलगाव,
Samruddhi Mahamarg पुलगावजवळ समृद्धी महामार्ग आणि सभोवतालचे ठिकाण अपघातांचे केंद्र बनले आहे. लक्ष्य गाठण्याच्या नादात अंधाधुंद वेगाने वाहन चालवणे चालकांसाठी घातक ठरत आहे. मंगळवारी दोन वेगवेगळ्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असतानाच आज शनिवार १३ रोजी कार आणि आयशरच्या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले. ही आठवड्यातील तिसरी घटना असून समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका सुरूच आहे.
अफझल हुसेन (३८), सिराज हुसेन (३३), अवेज उर्फ पाशू प्यारे खान (२१), दानिश प्यारे खान (३०) आणि परवेज खान सर्व रा. एकता कॉलनी, महेंद्रनगर, नागपूर अशी जखमींची नावे आहेत.
सर्व जखमी हे नागपूर Samruddhi Mahamarg येथील रहिवासी असून मुंबईहून नागपूरकडे कारने परत येत होते. दरम्यान, त्याच दिशेने धावणार्या आयशर ट्रकला भरधाव कारने धडक दिली. या भीषण अपघातात कारचा समोरील भाग चकाचूर झाला असून आयशर ट्रक सुद्धा रस्त्यावर पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जीवितहानी झाली नसली तरी कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले. अपघात घडताच समृद्धी महामार्ग रुग्णवाहिका आणि पुलगाव येथील रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना तात्काळ पुलगाव ग्रामीण रुग्णालयात हलविले. प्राथमिक उपचारानंतर जखमींना सावंगी रुगणालयात हलविले. पुलगाव पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
पुलगावपासून १० किलोमीटर अंतरावर विरुळ हे गाव असून येथून समृद्धी महामार्ग गेला आहे. सध्या या मार्गाने वाहतूक अपघातात मोठी वाढ झाली आहे. वेगवान मार्गावर प्रवास करताना अनेक चालक मर्यादित वेगापेक्षा जास्त वेगाने वाहन चालवतात. वरून सूर्यप्रकाश आणि वाहनातील एअर-कंडिशनिंगमुळे थंड हवा असताना चालकांना झोपेची डुलकी येते आणि त्यामुळे अपघात घडतात. गेल्या आठवड्यात समृद्धी महामार्गाच्या खालच्या भागातील आर्वी रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन ३ जण ठार झाले. त्यानंतर लगेच २४ तासांत मार्डाजवळ एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. अशातच शनिवारी पुन्हा याच मार्गावर झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले.