मेळघाटात बिबट्याच्या कातडीची तस्करी उघड

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
संयुक्त कारवाईत तीन आरोपी जेरबंद
मोठ्या शिकारी रॅकेटचा संशय
 
धारणी, 
Smuggling of leopard skin मेळघाट व्याघ्र प्रकल्प परिसरात वन्यजीव गुन्ह्यांचे सत्र सुरू असतानाच वन विभागाने मोठी कारवाई करत बिबट्याच्या कातडीचा तुकडा बेकायदेशीररीत्या बाळगणार्‍या तीन आरोपींना रंगेहात अटक केली आहे. चौराकुंड परिसरात अलीकडेच विषप्रयोगामुळे चार रानगवे, एक भेडकी व माकडांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच बिबट्याच्या कातडीच्या तस्करीचा हा प्रकार हरिसाल वनपरिक्षेत्रातून उघडकीस आल्याने वन्यजीव संवर्धनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
 
 
leopard skin
 
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागांतर्गत वन्यजीव गुन्हे नियंत्रण कक्ष अमरावती, हरिसाल वनपरिक्षेत्रातील कर्मचारी तसेच वन्यजीव प्रेमींच्या संयुक्त पथकाने ही कारवाई शुक्रवारी १२ जून रोजी सायंकाळी केली. गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशातून बिबट्याच्या कातडीची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार हरिसाल येथील वन विभागाच्या तपासणी नाक्यावर सापळा रचण्यात आला.
 
 
 
सायंकाळी सुमारे ५.३० वाजताच्या सुमारास दोन दुचाकींवरून आलेल्या संशयितांना अडवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान त्यांच्याकडे बिबट्याच्या कातडीचा तुकडा आढळून आल्याने तिघांनाही तात्काळ ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मांगीलाल किशोरी इवणे (४५), रा. चिरा, जि. बैतुल (मध्यप्रदेश), दीपक बाबुलाल उईके (२५), रा. ढालगाव, जि. खंडवा (मध्यप्रदेश) आणि कमल रतन ठाकूर (३१), रा. धामा गोलाई, जि. खंडवा (मध्यप्रदेश) यांचा समावेश आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. वन विभागाने जप्त केलेला कातडीचा तुकडा तपासासाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तिन्ही आरोपींना शनिवारी धारणी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १५ जूनपर्यंत वन कोठडी सुनावली आहे. वनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी राऊत यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.