बीएमडी टेस्टबेड भरताला मोठे यश!

डीआरडीओची ऐतिहासिक कामगिरी

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Success in filling BMD testbed संरक्षण क्षेत्रात भारताने ऐतिहासिक कामगिरी नोंदवत बहुस्तरीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण (BMD) प्रणालीची यशस्वी चाचणी पूर्ण केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून ५,००० किलोमीटरपेक्षा अधिक पल्ल्याची तसेच मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे हवेतच रोखून नष्ट करण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे. या यशामुळे अशा अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान असलेल्या मोजक्या देशांच्या गटात भारताचा समावेश झाला आहे.संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) १० आणि ११ जून रोजी सलग तीन उड्डाण चाचण्या घेतल्या. या चाचण्यांमध्ये पृथ्वीच्या वातावरणाच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी शत्रूच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना अडवण्याची क्षमता तपासण्यात आली. सर्व चाचण्या यशस्वी ठरल्या असून इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांनी लक्ष्य अचूकपणे नष्ट केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
 
 
 

BMD test drdo 
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या प्रणालीमुळे शत्रूच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांबरोबरच लढाऊ विमाने आणि हवाई चेतावणी व नियंत्रण प्रणाली (AWACS) यांसारख्या धोक्यांना देखील निष्प्रभ करण्याची क्षमता भारताला मिळाली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ही प्रणाली देशाच्या हवाई संरक्षण कवचाला अधिक मजबूत बनवते.या BMD कार्यक्रमांतर्गत “एंडो-अॅटमॉस्फेरिक” आणि “एक्सो-अॅटमॉस्फेरिक” अशा दोन स्तरांवर संरक्षण क्षमता विकसित करण्यात आली आहे. पृथ्वीच्या वातावरणाच्या आत १०० किलोमीटरपर्यंत कार्य करणारी आणि त्यापेक्षा वरच्या स्तरावरही लक्ष्य भेदणारी प्रणाली भारताकडे आता उपलब्ध आहे. दरम्यान, ५,००० किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याची आंतरखंडीय क्षेपणास्त्रे अत्यंत वेगाने आणि प्रचंड उंचीवरून लक्ष्यावर मारा करतात, ज्यामुळे त्यांना शोधणे आणि रोखणे कठीण असते. अशा धोक्यांना तोंड देण्यासाठी विकसित केलेली ही बहुस्तरीय संरक्षण प्रणाली भारताच्या संरक्षण क्षमतेत मोठी भर घालणारी ठरली आहे.