पत्रकारितेतून 'स्व' भाव प्रकट व्हावा

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
सुनील साठे यांचे प्रतिपादन
- देवर्षि नारद पुरस्कार सोहळा उत्साहात
 
नागपूर, 
Sunil Sathe भारतीय पत्रकारिता ही भारतीय समाजाच्या अनुरूप तसेच 'स्व' भाव प्रकट करणारी हवी, असे प्रतिपादन प्रज्ञा प्रवाहचे सुनील साठे यांनी आज येथे केले. विश्व संवाद केंद्रातर्फे (पूर्व विदर्भ) वनामती सभागृहात आद्य पत्रकार देवर्षि नारद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित देवर्षी नारद पुरस्कार सोहळ्यात सुनील साठे बोलत होते. प्रमुख पाहुणे पद्मश्री खा. ॲड. उज्ज्वल निकम, विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष सुधीर पाठक, रा.स्व. संघाचे महानगर संघचालक राजेश लोया याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
 
 
प्रमुख वक्ते सुनील साठे म्हणाले की, भारतीय पत्रकारितेचा मूळ आधार 'स्व' होता. स्वातंत्र्य आंदोलनाचा आधार पत्रकारिता होता. 'स्व' चे प्रकटीकरण हा भाव होता. ब्रिटीशांनी पत्रकारितेत आधुनिकता आणली हे म्हणणे चुकीचे आहे. टाटा, किर्लोस्करांचे आधुनिकीकरणाची प्रयत्न होते. पण, ब्रिटीशांनी अडथळा आणण्याचे भरपूर प्रयत्न केले. भारत स्वतंत्र झाला तरी 'स्व' हरवला. त्या 'स्व'चा शोध आताही सुरू आहे. 'स्व' आधारे आपल्या सर्व व्यवस्था उभ्या रहाव्या, असा प्रयत्न आहे. भारतीय पत्रकारिताही भारतीय समाजाच्या अनुरूप असावी. त्यात 'स्व'च्या परिप्रेक्ष्यातून संशोधन सुरू आहे. वार्तांकन किंवा पत्रकारिता नॅरेटिव्हच्या प्रभावाखाली न जाता देशहिताची व्हायला हवी, हे साठे यांनी अधोरेखित केले.
 
खा. उज्ज्वल निकम
प्रमुख पाहुणे पद्मश्री खा. ॲड. उज्ज्वल निकम म्हणाले की, समाजसुधारणेची मोठी जबाबदारी पत्रकारांवर आहे. जगातील युद्धाचे सावट आणि येणारा काळ पाहता भारतात अशांतता निर्माण होणार नाही, माथे भडकवली जाणार नाहीत, याची काळजी पत्रकारांना घ्यावी लागणार आहे. प्रत्येकानेच आपली नैतिक जबाबदारी पाळावी.
 
 
प्रारंभी विश्व संवाद केंद्र व पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष सुधीर पाठक यांनी प्रास्ताविक केले. निखील भुते, दिव्येश द्विवेदी, संजय लचुरिया, नीकिता गावंडे, सुनील कुहीकर, रामकृष्ण मठाची पत्रिका जीवन विकास (स्वामी ज्ञानगंगा महाराज), हेमांगी कुलकर्णी, वेद घुळघुळे, वैष्णवी ठाकरे आदींंना शाल, श्रीफळ व रोख असे पुरस्कार प्रदान करण्यात आला. निवड समिती सदस्यांचाही सत्कार करण्यात आला.
 
रा.स्व. संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह अतुल मोघे, महानगर कार्यवाह रवींद्र बोकारे, अयोध्या भाग संघचालक मनोहर सपकाळ, अजनी भाग संघचालक डॉ. रमाकांत कापरे, विदर्भ प्रांत प्रचार प्रमुख संजय गुळवे, महानगर प्रचार प्रमुख ब्रजेश मानस, नरकेसरी प्रकाशन लिमिटेडचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. विलास डांगरे, संचालक मीरा कडबे आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते.