पुणे/मुंबई
supriya sule राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडत या सर्व चर्चांना सध्या तरी आधार नसल्याचे म्हटले आहे. “विलीनीकरणाबाबत आमच्याशी कुणाचाही संपर्क झालेला नाही,” असे सांगत त्यांनी पक्षाच्या भूमिकेबाबत सुरू असलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले की, राजकीय पक्षांमध्ये कामकाजाच्या निमित्ताने नेत्यांच्या भेटीगाठी होत राहतात. मात्र, या भेटींमधून कोणतेही विलीनीकरण किंवा राजकीय पुनर्रचना याबाबत चर्चा झाल्याचे आपल्याला माहिती नाही. शरद पवार यांच्याकडेही अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि त्यांनीही कुणाला असा प्रस्ताव दिलेला नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, ममता बॅनर्जी आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या अलीकडील भेटीबाबतही त्यांनी अनभिज्ञता व्यक्त केली. त्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.देशातील सध्याच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना सुप्रिया सुळे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. “महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. आता राजकारणाच्या आरोप-प्रत्यारोपांपेक्षा देश वाचवण्याची गरज आहे,” असे त्या म्हणाल्या. सत्ताधारी आणि विरोधकांनी परस्पर संघर्षात अडकून न राहता जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे, असेही त्यांनी नमूद केले.पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावर टीका करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही अशा राजकीय पद्धतीचा अवलंब केला नसल्याचे स्पष्ट केले. “घर फोडा, पक्ष फोडा अशी राजकारणाची पद्धत आम्ही स्वीकारलेली नाही आणि भविष्यातही स्वीकारणार नाही,” असे त्या म्हणाल्या.
अन्नत्याग आंदोलन
याचबरोबर आमदार रोहित पवार supriya sule यांच्या आंदोलनावरही त्यांनी भूमिका मांडली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सुरू केलेल्या उपोषणाबाबत बोलताना सुळे यांनी त्यांना सुरुवातीपासूनच उपोषण टाळण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले. “त्यांचा शेतकऱ्यांप्रती असलेला भाव आणि लढा कौतुकास्पद आहे. मात्र अशा कठीण उन्हाळ्यात उपोषण करताना आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे,” असे त्या म्हणाल्या.राज्यातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आणि शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय घडामोड विशेष चर्चेत आली आहे. राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चांना सुळे यांच्या या वक्तव्यानंतर तूर्तास तरी थांबा मिळाल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.