पिंपरी-चिंचवड,
TCS employee commits suicide in Pune पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरात एका धक्कादायक घटनेत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमधील 48 वर्षीय कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दोन महिला सहकारी आणि कंपनीशी संबंधित नसलेल्या एका व्यक्तीसह तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृत कर्मचाऱ्याची ओळख अमित ब्रह्मे अशी पटली असून तो भोसरीतील सुविधा पार्क परिसरात वास्तव्यास होता आणि हिंजवडीतील टीसीएस कार्यालयात कार्यरत होता. 2 जून रोजी घरी आत्महत्या केल्यानंतर त्याने मागे सुसाईड नोट ठेवली होती, ज्यामध्ये त्याने काही सहकाऱ्यांकडून होत असलेल्या मानसिक छळाचा उल्लेख केला आहे. या नोटच्या आधारे त्याच्या 19 वर्षीय मुलाने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, कामाच्या ठिकाणी दोन महिला सहकारी त्याचा वारंवार अपमान करत होत्या, शिवीगाळ करत होत्या आणि कामगिरीवर परिणाम होईल अशा प्रकारच्या धमक्या देत होत्या. आजारपणाच्या आणि कौटुंबिक अडचणींच्या काळातही त्याला रजा नाकारून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.याशिवाय विनोद पालिचा नावाच्या व्यक्तीने टीसीएसला खोटे ईमेल पाठवून त्याची बदनामी केली आणि त्याच्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेअंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि संबंधित कलमांखाली तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या माहितीनुसार, दोन महिला आरोपींची चौकशी करण्यासाठी कंपनीला नोटीस बजावण्यात आली असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.पोलिसांनी सांगितले की, सुसाईड नोटमधील सर्व आरोपांची सखोल चौकशी केली जात असून या प्रकरणाचा सर्व पैलूंनी तपास सुरू आहे.