अध्यक्षपदी सनदी लेखापाल राजेंद्र भुतडा यांची निवड
वर्धा,
wardha district maheshwari election वर्धा जिल्हा माहेश्वरी सभेच्या २०२६-२९ या कार्यकाळासाठी नव्या कार्यकारिणीची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. सेलू येथे आयोजित सभेत अध्यक्षपदी सनदी लेखापाल राजेंद्र भुतडा यांची, तर सचिवपदी राजेंद्र भांगडिया (हिंगणघाट) यांची निवड करण्यात आली. याशिवाय उपाध्यक्षपदी शंकरलाल राठी (पिपळखुटा), कोषाध्यक्षपदी अनिल केला (वर्धा), प्रचारमंत्री मनोजकुमार पनपालिया (पुलगाव) तसेच संघटनमंत्री पदी युवराज राठी (सेलू) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून धर्मेंद्र मुंधडा व विशाल राठी, तसेच निवडणूक निरीक्षक व अमरावती जिल्हाध्यक्ष अशोक राठी यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्रीराम टावरी होते. यावेळी विदर्भ प्रदेश माहेश्वरी संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष कमल माहेश्वरी, नारायणदास राठी, डॉ. नारायणदास लोहिया, गोपाल टावरी, श्याम राठी, हरीश गांधी, सज्जन मोहता, मोहन चांडक, डॉ. ललित राठी, गिरधर जाखोटिया, डॉ. ज्ञुंबर भूतडा, गोपाल टावरी, डॉ. विजय भट्टड, विनोद मुंधडा, जिल्हा महिला संघटनेच्या अध्यक्ष शोभा गांधी, माजी अध्यक्ष सुनीता तापडिया, मनोरमा राठी तसेच सर्व सचिव, पदाधिकारी, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
नवनियुत अध्यक्ष राजेंद्र भूतडा यांनी आगामी तीन वर्षांसाठी समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देण्याचा संकल्प व्यत केला. जिल्हाभर पावसाच्या पाण्याचे संधारण (रेन वॉटर हार्वेस्टिंग), सौरऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन, महिलांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम, तसेच जिल्हास्तरीय आपत्ती निवारण समितीची स्थापना यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. वल्लभ पनपालिया यांचा सत्कार करण्यात आला. संचालन युवराज भूतडा यांनी केले, तर सेलू तहसीलचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश राठी यांनी आभार मानले.