सलग दोन दिवस पावसाची हजेरी
वर्धा,
wardha: heavy rainfall दिवसभर ४३ अंश सेल्सिअसच्या उकाड्यात जिवाची काहिली होत असताना शुक्रवार १२ रोजी रात्री ११.३० वाजता व शनिवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी रात्री आलेल्या दमदार पावसाने वातावरणात गारवा पसरल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
यंदा रोहिणी नक्षत्र पूर्ण कोरडे गेले. तर मृग नक्षत्र पाच दिवसांचा कालावधी लोटून साधा पावसाचा शिरवासुद्धा आला नाही. शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होता. मृग नक्षत्रात जिल्ह्याचे तापमान ४४ अंश सेल्सिअसच्यावर गेल्याने नागरिकांच्या जिवाची काहिली होत होती. शेतशिवारातील कामे ठप्प पडली होती. वाढत्या उन्हामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू होती.
अशातच शुक्रवार १२ रोजी जिल्ह्यातील काही भागांत सायंकाळी पावसाची एन्ट्री झाली. समुद्रपूर तालुयात वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावल्याने झाडे उन्मळून पडली. तर भूगाव, सेलूकाटे, आष्टा, गोजी येथे किमान अर्धा तास जोरदार पाऊस आला. सायंकाळच्या सुमारास वर्धा शहरात पाण्याचा शिरवा आल्याने मातीचा सुगंध तेवढा दरवळला. मात्र, रात्री ११.३० वाजता वर्धा शहरात दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा पसरून नागरिकांना दिलासा मिळाला. शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास शहरासह परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पाऊस आल्याने शेतशिवारात चैतन्याचे वातावरण पसरले असून शेतकरी पुन्हा जोमाने कामाला लागला आहे. शेतात वखरणी, रोटावेटर, बेड फाडणे आदी कामे सुरू आहे. धूळ पेरणी केलेल्या शेतकर्यांना तर संजीवनीच मिळाली आहे. आज कृषी केंद्रांमध्ये बी-बियाणे खरेदीसाठी शेतकर्यांची गर्दी दिसून आली.