- दोन आरोपी अटकेत
अनिल कांबळे
नागपूर,
Weapons seized गिट्टीखदान पोलिसांनी शुक्रवारी दाभा परिसरातील एका कॅफेवर आणि आरोपीच्या घरावर छापा टाकून मोठा शस्त्रसाठा जप्त केला. या कारवाईत तीन देशी पिस्तुल, जिवंत काडतुसे, तलवारी आणि चाकू हस्तगत करण्यात आले असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात शस्त्रे सापडल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. अब्बास सय्यद खान (२५, गणेशनगर) आणि ऋतिक नाईक (२५) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पोलिसांना शुक्रवारी गुप्त माहिती मिळाली होती की, अब्बास हा आपल्या साथीदारासह दाभा रिंगरोडवरील ‘कॅफे’ येथे थांबला असून त्याच्याकडे देशी पिस्तूल आहे. तसेच तो एखाद्या गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने परिसराला घेराव घालून छापा टाकला. तपासणीदरम्यान अब्बासकडून एक देशी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरीही झडती घेतली. या कारवाईत आणखी दोन देशी पिस्तुले, दोन ते तीन तलवारी आणि काही चाकू आढळून आले. पोलिसांच्या माहितीनुसार, अब्बास सय्यद खान हा सराईत गुन्हेगार असून २०२२ मध्ये वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दुहेरी हत्याकांड प्रकरणात त्याचे नाव समोर आले होते. त्या प्रकरणात त्याच्यावर मकोका अंतर्गतही कारवाई करण्यात आली होती. प्राथमिक तपासात आरोपी एखाद्या गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन संभाव्य मोठी घटना टाळल्याचे मानले जात आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक ललिता तोडासे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.