लंडन,
will young इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी न्यूझीलंड क्रिकेट संघाने अनुभवी फलंदाज विल यंगचा संघात समावेश केला आहे. संघातील महत्त्वाचा फलंदाज केन विल्यमसन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ३३ वर्षीय विल यंग १४ जून रोजी इंग्लंडमध्ये दाखल होणार असून सोमवारपासून संघासोबत सरावाला सुरुवात करणार आहे.
मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडने न्यूझीलंडवर मात करत आघाडी घेतली आहे. आता दुसरा कसोटी सामना १७ जूनपासून ओव्हल मैदानावर खेळवला जाणार असून किवी संघ पुनरागमनाच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. विल यंगने डिसेंबर २०२५ मध्ये आपला अखेरचा कसोटी सामना खेळला होता. २०२० मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या यंगने आतापर्यंत २३ कसोटी सामने खेळले आहेत. संघातील स्थान कायम राखण्यासाठी त्याला सातत्याने संघर्ष करावा लागला असला तरी, संधी मिळाल्यावर त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
विशेषतः २०२४ मध्ये भारताविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटी मालिकेत त्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्या मालिकेत सहा डावांत २४४ धावा करत त्याने न्यूझीलंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्याच्या या दमदार प्रदर्शनामुळे त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. दरम्यान, निवृत्तीनंतरही केन विल्यमसन काही दिवस संघासोबत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. संघातील संक्रमणाचा काळ सुरळीत पार पडावा आणि युवा खेळाडूंना मार्गदर्शन मिळावे, यासाठी आपण काही काळ संघासोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दुसरीकडे, इंग्लंडनेही दुसऱ्या कसोटीसाठी आपल्या संघात बदल केले आहेत. कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सन यांना वगळून जोफ्रा आर्चर आणि जॉर्डन कॉक्स यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत दोन्ही संघ नव्या संयोजनासह मैदानात उतरणार असून सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.