- मराठी येत नसल्याने अटक ठरवली होती अवैध : आरोपीला १६ जूनपर्यंत पोलिस कोठडी
अनिल कांबळे
नागपूर :
yashodharanagar murder case यशोधरानगर हत्या प्रकरणात नाट्यमय घडामोड घडली असून, आरोपीला मराठी भाषा समजत नसल्याच्या बचाव पक्षाच्या दाव्याला पोलिसांनी शाळेच्या गुणपत्रिकांच्या आधारे छेद दिला आहे. हत्याकांडातील मुख्य आरोपीला हिंदी भाषा येत होती आणि पोलिसांनी त्याला अटक करतेवेळी मराठीत माहिती दिली. या कारणावरुन आरोपीची अटक अवैध असल्याचे न्यायालयाचे म्हणणे होते. मात्र, आरोपीने शालेय शिक्षणादरम्यान मराठी विषयाचा अभ्यास केला असून त्यात गुणही मिळविल्याचे दस्तावेज पोलिसांनी न्यायालयात सादर केले. त्यानंतर न्यायालयाने आरोपीची अटक कायदेशीर ठरवत त्याला १६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
आरोपी मुज्जमिल ऊर्फ मुज्जू हसन अली (१८) आणि एका विधिसंघर्षित बालकाने प्रेमप्रकरणातून एका युवकाचा खून केला होता. त्या हत्याकांडात दोघांनाही ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांनी १० जून रोजी मुज्जमिलला अटक करून ११ जून रोजी न्यायालयात हजर केले होते. पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली असताना बचाव पक्षाने आरोपीला मराठी भाषा समजत नसल्याचा युक्तिवाद केला. अटकेची कारणे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम ४७(१) आणि ४७(२) अंतर्गत मराठीत देण्यात आली होती. मात्र ती भाषा आरोपीला समजत नसल्याचा दावा करण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा संदर्भ देत अटक प्रक्रियेत त्रुटी असल्याचे नमूद केले आणि अटक बेकायदेशीर ठरवत आरोपीच्या तत्काळ सुटकेचे आदेश दिले होते. त्यामुळे दिवसभर या प्रकरणाची शहरभर चर्चा होती.
पोलिसांनी पुन्हा केली अटक
सुटकेनंतरही गुन्ह्याचे गांभीर्य आणि तपासाची गरज लक्षात घेऊन यशोधरानगर पोलिसांनी ११ जून रोजी आरोपीला पुन्हा ताब्यात घेतले. नव्याने अटक प्रक्रिया पूर्ण करून १२ जून रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी बचाव पक्षाने एकदा सुटका झालेल्या आरोपीला न्यायालयाची पूर्वपरवानगी न घेता त्याच गुन्ह्यात पुन्हा अटक करता येत नसल्याचा युक्तिवाद केला. मात्र सरकारी पक्षाने आरोपीला जामीन मंजूर करण्यात आलेला नव्हता, तसेच कोणतेही जामीनपत्र किंवा हमीपत्र सादर झालेले नव्हते. त्यामुळे पूर्वीची सुटका ही जामीन समजता येणार नाही, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
मराठीच्या गुणपत्रिकेमुळे बदलले चित्र
सुनावणीदरम्यान तपास अधिकाऱ्यांनी आरोपीच्या शाळेतील शैक्षणिक नोंदी आणि गुणपत्रिका न्यायालयात सादर केल्या. या कागदपत्रांमध्ये आरोपीने मराठी विषयाचा अभ्यास केल्याचे आणि त्यात गुण मिळविल्याचे स्पष्ट दिसून आले. पोलिसांनी या नोंदींच्या आधारे आरोपीला मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा दावा केला. न्यायालयाने संबंधित कागदपत्रांची पाहणी करून दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीची पुनर्अटक कायदेशीर असल्याचे नमूद केले.
१६ जूनपर्यंत पोलिस कोठडी
न्यायालयाने आदेशात नमूद केले की, आरोपीच्या सुटकेनंतर तपासात विशेष प्रगती झालेली नाही. गुन्ह्यात वापरण्यात आलेला मोबाईल फोन, शस्त्र तसेच इतर महत्त्वाचे पुरावे जप्त करणे अद्याप बाकी आहे. गुन्ह्याचे गांभीर्य आणि तपासाच्या गरजा लक्षात घेता न्यायालयाने आरोपीला १६ जून २०२६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सध्या आरोपी यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या कोठडीत असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.