मैदानाची रुंदी कमी होण्यावरुन महापालिकेला नोटिस

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
yashwant Nagar Sports Ground उत्तर अंबाझरी रोडवरील यशवंत नगर (म्हाडा कॉलनी) येथील एकमेव खेळाचे मैदान आणि खुल्या जागेचे क्षेत्रफळ कमी करून तिथे मनपाकडून होत असलेल्या कम्पाऊंड वॉलच्या कथित अवैध बांधकामाविरोधात यशवंत नगर नागरिक समितीने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांनी मनपाला नोटीस बजावून आठवड्याभरात उत्तर सादर करण्याचे आदेश दिलेत. समितीचे अध्यक्ष यशवंत पुरुषोत्तम दांडेकर ( ८५ ) यांनी अ‍ॅड. तुषार मंडलेकर यांच्यामार्फत जनहित याचिकेअंतर्गत मध्यस्थी आणि निदेर्शांसाठी सिव्हिल अ‍ॅप्लिकेशन दाखल केली आहे.
 
 
ngp
 
नागरिकांचा आरोप आहे की, गेल्या एक महिन्यापासून काही समाजकंटक या बांधकामात अडथळे आणत आहेत. त्यांच्या दबावाखाली येऊन मनपा प्रशासन मैदानाच्या चारही बाजूंचे कोपरे चौकोनी ठेवण्याऐवजी ते वक्राकार करून मैदानाचे एकूण क्षेत्रफळ कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. कोपरे वक्राकार केल्यास तिथे मोकळी जागा सुटेल, जिथे भविष्यात अतिक्रमण होण्याची दाट शक्यता आहे. हे मैदान गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून सुरक्षित होते. परंतु, काही काळापूर्वी समाजकंटकांनी जुनी भिंत तोडल्यामुळे तिथे मद्यपी व टवाळखोरांचा त्रास वाढला असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच संपूर्ण मैदान सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.
 
 
कायद्याचे उल्लंघन केल्याचा दावा
याचिकेत म्हटले आहे की, रहिवाशांच्या संमतीशिवाय मैदानाचा आकार किंवा क्षेत्रफळ कमी करणे हे नियमांचे थेट उल्लंघन आहे. विकास आराखड्यातील मंजूर लेआउटमधील खुली जागा किंवा मैदान कमी करण्याचा अधिकार मनपा किंवा कोणत्याही बाहेरील व्यक्तीला नाही. नागरिकांनी याचिकेत हायकोर्टाने २०१३ मध्ये वेळोवेळी दिलेल्या आदेशांचा दाखला दिला आहे. हायकोर्टाने यापूर्वीच स्पष्ट निर्देश दिले आहेत की, विकास आराखड्यात खेळ किंवा खुल्या जागेसाठी आरक्षित असलेल्या जमिनींवरील कोणतेही अवैध बांधकाम किंवा अतिक्रमण गुंठेवारी कायद्यांतर्गतही नियमित करता येणार नाही.
अशा आहेत मुख्य मागण्या
मनपा आयुक्तांना यशवंत नगर मैदानाचा कोणताही भाग किंवा क्षेत्रफळ कमी करण्यापासून त्वरित रोखावे. ११ सप्टेंबर २०२५ च्या ठरावाअंतर्गत काम करताना मैदान जसे आधी होते (९० अंश कोनामध्ये), तसेच त्याचे कोपरे ठेवून बांधकाम करण्याचे निर्देश द्यावेत. मैदानात नागरिकांच्या सुविधेसाठी दोन लहान दरवाजे ठेवावेत. अंबाझरी तलावाच्या पुराचा फटका यशवंत नगरला बसला होता, त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मैदानाच्या खालच्या बाजूला ५ चेंबर्स तयार करण्याचे आदेश द्यावेत. या प्रकरणी रहिवाशांनी २३ आणि २८ एप्रिल २०२६ रोजी मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांच्याकडेही लेखी तक्रार केली होती, मात्र त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर नागरिकांना हायकोर्टाचे दार ठोठवावे लागले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. तुषार मंडलेकर , मनपातर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणीक यांनी बाजू मांडली.