शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ऐतिहासिक आयोजन

    दिनांक :14-Jun-2026
Total Views |
पुणे
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात येणार आहे. चार दिवस चालणारे हे संमेलन ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडणार असून, मराठी साहित्यविश्वासाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
 

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 
पुण्यात होणारे हे साहित्य संमेलन १४ वे असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रथमच अशा प्रकारचे साहित्य संमेलन भरविण्यात येत आहे. या संदर्भातील स्थळ आणि तारखांची निश्चिती साहित्य महामंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत एकमताने करण्यात आली, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी पत्रकार परिषदेत दिली.या पत्रकार परिषदेला साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर तसेच ‘पुणे पुस्तक महोत्सवा’चे आयोजन करणाऱ्या समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे उपस्थित होते. तसेच ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह महामंडळाचे सर्व सभासद या बैठकीला उपस्थित असल्याचे सोमण यांनी सांगितले.
 
 
बैठकीत संमेलनाच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संमेलनासाठी आवश्यक असलेले भव्य प्रांगण, प्रशस्त पार्किंग व्यवस्था तसेच विद्यापीठातील सुमारे दीड हजार प्राध्यापक व कर्मचारी संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करतील, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी दिली. या सर्व बाबींचा विचार करून शतकमहोत्सवी संमेलन पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.संमेलनातील प्रमुख कार्यक्रम विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या प्रांगणात, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये तसेच छत्रपती संभाजी महाराज सभागृहात पार पडणार आहेत. तर छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा परिसरात कविकट्टा, कथाकथन यांसारखे उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. शहरातील वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक सुविधांवर येणारा ताण टाळण्यासाठी विद्यापीठ परिसराची निवड करण्यात आल्याचेही सोमण यांनी स्पष्ट केले.
 
 
दरम्यान, साहित्य महामंडळाच्याAkhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan  महाकोष निधीत सध्या अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असून, त्याच्या व्याजातून महामंडळाचे स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संकेतस्थळावर साहित्य संमेलनांची सविस्तर व एकत्रित माहिती उपलब्ध होणार असून, पुढील दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहितीही योगेश सोमण यांनी दिली.मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेला नव्या शतकात नवे परिमाण देणारे हे शतकमहोत्सवी संमेलन पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भव्य स्वरूपात पार पडणार असल्याने साहित्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.