कन्नमवारग्राममध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न

    दिनांक :14-Jun-2026
Total Views |
सीसीटीव्हीत तिघे कैद
 
वर्धा,
ATM in Kannamwargram जिल्ह्यात पुन्हा एकदा एटीएम सेंटर फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. कारंजा तालुयातील कन्नमवारग्राम येथे हा प्रकार घडला. चोरट्यांनी एटीएम मशीनचे नुकसान केले. या प्रकरणी शाखा व्यवस्थापक पुनम लाडे (३५) यांनी कारंजा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
 
 
atm
 
तक्रारीनुसार, १३ जून रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्यांना वेंडरकडून फोन आला. त्यात बँक ऑफ महाराष्ट्राच्या कन्नमवारग्राम शाखेतील एटीएम केंद्रात चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी शाखा व्यवस्थापक अश्वीन भांगे यांना संपर्क करून माहिती दिली आणि स्वतः घटनास्थळी पोहोचल्या. तेथे पाहणी केली असता चोरांनी एटीएम रूमचे छत (रूफ सिलिंग) कापल्याचे दिसून आले. सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर स्प्रे मारण्यात आला होता. तसेच अलार्म यंत्रणा तोडण्यात आली होती. एटीएम मशीनच्या उजव्या बाजूस कटर मशीनने कापण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. मात्र, चोरांचा हा प्रयत्न अपयशी ठरला. या घटनेत सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात तीन चोरांच्या हालचाली कैद झाल्या आहे. पहाटे ३.५२ ते ४ वाजेदरम्यान ते एटीएम केंद्रात होते. एटीएममधून कोणतीही रोख रकम चोरीला गेली नसल्याचे सांगण्यात आले.