नागपूर,
समाजात बदल घडवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने स्वतःमध्ये बदल घडवित स्वदेशीचे वातावरण कायम राखले पाहिजे. तसेच प्रत्येक व्यावसायिकाने आपल्या आस्थापनेत स्वदेशी उत्पादन टिकवून ठेवण्याला प्राधान्य दिले पाहिजे. मुख्यत: स्वदेशी ही केवळ एक आर्थिक संकल्पना नसून राष्ट्रउभारणीचा पाया असल्याने भारतीयांच्या मनात स्वदेशीची भावना जागृत झाली पाहिजे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह Atul Moghe प्रा. अतुल मोघे यांनी केले.
रामनगर, बाजी प्रभू चौकातील अमेय सहवास येथे स्वदेशी जागरण मंच आणि स्वदेशी व्यापारी मंच यांच्या विदर्भ प्रांतीय कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने स्वदेशी व्यापारी मंचचे राष्ट्रीय संयोजक बी. सी. भरतीया, प्रा. अजय पत्की, स्वदेशी जागरण मंचचे नागपूर महानगर संयोजक प्रमोद मारोडकर, स्वदेशी जागरण मंचचे विदर्भ राज्य संयोजक, शिवाजीराव भालतिलक आदींची उपस्थिती होती.
आपल्या भाषणात अतुल मोघे पुढे म्हणाले की, देशाच्या सामर्थ्यासाठी, नागरिकांनी स्वदेशी सुरक्षा दलांच्या आधारावर कार्य केले पाहिजे. स्वातंत्र्याच्या वेळी स्वदेशीची व्याख्या काहीशी वेगळी होती, परंतु आजच्या परिस्थितीनुसार ती बदलली आहे. देशाची संपत्ती देशातच राहिली पाहिजे आणि परदेशी वस्तूंवरील अवलंबित्व कमी केले पाहिजे. व्यापाऱ्यांमध्ये देशी मालाच्या विक्रीसाठी वातावरण निर्माण करणे आणि आपली अर्थव्यवस्था मजबूत करत ही प्रक्रिया सुरू ठेवणे, हे स्वदेशी व्यापारी मंचाचे मूलभूत उद्दिष्ट असले पाहिजे.
याप्रसंगी प्रा. अजय पत्की यांनी सांगितले की, व्यापारी समुदायापर्यंत स्वदेशी विचार पोहोचवण्यासाठी व्यापक संवाद आवश्यक असून स्वदेशीला प्रोत्साहन देण्यासाठी मोहीम सुरू केली पाहिजे. राष्ट्रीय हित, व्यावसायिक हित आणि ग्राहक हित हेच स्वदेशी व्यापारी मंचचे उद्दिष्ट असल्याचे बी. सी. भरतीया यांनी सर्व उपस्थित सदस्यांचे स्वागत करताना सांगितले.
आगामी काळात शहराच्या प्रत्येक लेआऊटमध्ये स्वदेशी व्यापारी मंचची एक शाखा स्थापन केली जाईल. नागपुरातील जनतेपर्यंत स्वदेशी चळवळ पोहोचवण्यासाठी नियमित कार्यक्रम, सभा आणि जनजागृती मोहीम आवश्यक असल्याचे बी. सी. भरतीया यांनी सांगितले. स्वदेशी जागरण मंचचे नागपूर महानगर संयोजक प्रमोद मारोडकर यांनी सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना स्वदेशीची शपथ दिली.