- केंद्रीय संस्कृत विद्यापीठ व इम्मवर्स इनोवेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
नागपूर,
भारतीय ज्ञानपरंपरा, संस्कृत भाषा आणि आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांचा संगम घडवून भारतकेंद्रित ‘Civilizational AI’ ‘सिव्हिलायझेशनल एआय’ विकसित करण्याच्या उद्देशाने केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली आणि इम्मवर्स इनोवेशन्स प्रा. लि., नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २१ दिवसीय समर स्कूल कार्यशाळेला सोमवार, १५ जूनपासून नागपुरात प्रारंभ होत आहे. “भारतापासून नागरी एआयची उभारणी” या विषयावरील ही कार्यशाळा १५ जून ते ५ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
- भारतीय ज्ञान आणि एआयचा संगम
समर स्कूलचे समन्वयक तथा केंद्रीय योजना संचालक प्रा. मधुकेश्वर भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय ज्ञानप्रणाली, संस्कृत ग्रंथांचे डिजिटायझेशन, भाषा तंत्रज्ञान, मशीन लर्निंग आणि एआय-आधारित नवोपक्रम यांवर आधारित प्रशिक्षण या कार्यशाळेत दिले जाणार आहे. तज्ज्ञांची व्याख्याने, समूहचर्चा आणि प्रकल्पाधारित उपक्रम हे या कार्यशाळेचे प्रमुख आकर्षण असतील.
- देशभरातील ३० विद्यार्थ्यांची निवड
या कार्यशाळेसाठी देशभरातील नामांकित विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमधून ३० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. दिल्ली विद्यापीठ, जेएनयू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुदुचेरी विद्यापीठ, संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठ, गोरखपूर विद्यापीठ यांसह अनेक प्रतिष्ठित संस्थांतील विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत.
- मान्यवरांची उपस्थिती
उद्घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. पंकज चांदे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेड़ी असतील. इम्मवर्स इनोवेशन्सचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामकृष्णन आणि सह-संस्थापक प्रीती रामकृष्णन हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
- संशोधनाला नवी दिशा
सह-समन्वयक डॉ. योगेंद्र दीक्षित यांच्या मते, भारताची प्राचीन ज्ञानपरंपरा आणि आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता यांची सांगड घालून मूल्याधिष्ठित व मानवकेंद्रित एआय विकसित करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. भारतीय सांस्कृतिक वारशावर आधारित नव्या संशोधन आणि नवोपक्रमांना यामुळे चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.