शेगावात गुटख्याविरोधात मोठी कारवाई; ५० लाखांचा प्रतिबंधित माल जप्त

    दिनांक :14-Jun-2026
Total Views |
मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणारा गुटख्याचा कंटेनर पकडला
डीवायएसपी प्रदीप पाटील यांच्या पथकाची धडक कारवाई
 
शेगाव :
Confiscation of prohibited Gutkha राज्यात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूच्या अवैध व्यापाराविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून शेगाव पोलिसांनी सुमारे ५० लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला जात असलेला गुटख्याने भरलेला कंटेनर पोलिसांनी पकडल्याने गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथून यवतमाळ व अकोला जिल्ह्यात विक्रीसाठी नेण्यात येत होता. याबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सापळा रचला. संशयित कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आढळून आला. त्यानंतर संपूर्ण माल जप्त करण्यात आला.
 
 
gutakha
 
या कारवाईमुळे परिसरातील अवैध गुटखा व्यापार करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या धडक कारवाईमुळे गुटख्याच्या काळ्या बाजाराला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत अंदाजे ५० लाख रुपये असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. राज्यात प्रतिबंधित गुटख्याच्या विक्री व वाहतुकीवर कठोर निर्बंध असतानाही काही तस्कर विविध मार्गांनी हा माल बाजारात पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. मात्र अलीकडेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला होता. गंभीर स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्याचाही विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. शेगावातील ही कारवाई त्याच मोहिमेचा एक भाग मानली जात असून, जप्त मालाचा नेमका स्रोत, संबंधित तस्करीचे जाळे आणि या प्रकरणामागील मुख्य सूत्रधार कोण आहेत याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. आगामी काळात अशा प्रकारच्या आणखी धडक कारवाया होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, गुटखा तस्करीविरोधातील लढ्यात पोलिसांना मिळालेले हे महत्त्वाचे यश मानले जात आहे.