'तिघांचा जागीच मृत्यू' काळजाचा थरकाप उडवणारी घटना

    दिनांक :14-Jun-2026
Total Views |
धुळे
Dhule accident धुळे शहरातील पारोळा रोड परिसरात पहाटेच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रस्ता ओलांडत असताना वेगाने येणाऱ्या लक्झरी बसच्या धडकेत बाईकवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यानंतर परिसरात संताप आणि शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

Dhule accident news, Parola road Dhule accident, luxury bus accident 
मिळालेल्या माहितीनुसार, सुरतहून शेंदुर्णी (जि. जळगाव) येथे प्रवासी घेऊन जाणारी लक्झरी बस (क्रमांक AR 11 B 9191) पारोळा रोड परिसरातून जात असताना ही दुर्घटना घडली. पहाटेच्या वेळी बाईकवरील तिघे रस्ता क्रॉस करत असताना बसचा वेग जास्त असल्याने चालकाला नियंत्रण राखता आले नाही आणि बाईक थेट बसच्या चाकाखाली आली. अपघात इतका भीषण होता की तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
 
 
या अपघातात मृत्यूमुखी पडलेले तिघेही जण जळगाव जिल्ह्यातील वरखेडी गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये सुभाष लोटन धनगर (वय 42), निलेश संभाजी पाटील (वय 39) आणि सिंधुबाई शांताराम पाटील (वय 83) यांचा समावेश आहे. एकाच गावातील तिघांचा अशा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने वरखेडी गावावर शोककळा पसरली आहे.घटनेची माहिती मिळताच आझाद नगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त बस जप्त केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी बसचालक अशोक पाटील (वय 38, रा. पाचोरा) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, अपघातानंतर Dhule accident  परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या भागात वारंवार होणारे अपघात आणि वाहनांचा अतिवेग पाहता, प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. स्पीड ब्रेकर, योग्य प्रकाश व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणाच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.
या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पुन्हा एकदा रस्ते सुरक्षिततेचा प्रश्न गंभीरपणे पुढे आला आहे.