वर्धा,
dr-bhoyar वर्धा शहरातील रामनगर येथील लिजधारकांचे भूखंड शासनाने फ्री-होल्ड केले आहे. याबाबत स्पष्ट शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व फ्री-होल्ड धारकांना भूमी अभिलेख विभागाने त्यांच्या भूखंडाच्या मालकी हकाची मालमत्ता पत्रके तातडीने वितरित करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले. रामनगर येथील लिजधारकांचे भूखंड फ्री-होल्ड करून देखील त्यांना मालमत्ता पत्रक वितरणास विलंब होत होता. त्याअनुषंगाने समन्वयासाठी पालकमंत्री डॉ. भोयर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नगरपरिषद, महसूल, भूमी अभिलेख विभागांच्या अधिकार्यांची स्वतंत्र बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले.

बैठकीला नप उपाध्यक्ष प्रदिपसिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, नपचे मुख्याधिकारी विजय देशमुख, सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता एकनाथ टिकले, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक सुनील बन तसेच रामनगर येथील फ्री-होल्डधारक उपस्थित होते. रामनगर येथे अनेक नागरिक गेल्या कित्येक वर्षांपासून लिज जमिनीवर वास्तव्य करत होते. या नागरिकांना लीज जमिनींचा कायमस्वरुपी हक मिळावा, त्यांना हकाचा भूखंड उपलब्ध व्हावा म्हणून आपण शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर शासनाने रामनगर येथील लिजधारक नागरिकांचे भूखंड फ्री-होल्ड केले. वर्धा नपच्या वतीने या भूखंडधारकांचे फ्री-होल्डचे आदेश देखील पारीत करण्यात आले आहे.
फ्री-होल्डधारकांना आता त्यांच्या भूखंडाचे मालकी हकाचे मालमत्ता पत्रके उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे भूमी अभिलेख विभागाने येत्या महिनाभरात येथील ३५० भूखंडधारकांचे भोगवटदार वर्ग-१ चे मालमत्ता पत्रके तयार करून वितरित करावे. तसेच इतर सर्व प्रकरणे येत्या दोन महिन्यामध्ये निकाली काढून उर्वरित भूखंडधारकांना देखील मालमत्ता पत्रके उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश त्यांनी भूमी अभिलेख विभागाला दिले. लीज जमीन फ्री-होल्ड झाल्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून मालमत्ता पत्रके उपलब्ध व्हावी, अशी मागणी रामनगर येथील नागरिक करीत होते. त्यामुळे पालकमंत्र्यांनी नगर परिषद व भूमी अभिलेख यांच्यात समन्वय घडवून आणण्यासोबतच या कामास गती देण्यासाठी दोन्ही विभागाची संयुत बैठक घेतली व आवश्यक निर्देश दिले. त्यामुळे मालमत्ता पत्रके वितरणाचा विषय मार्गी लागला आहे