विजय माहुरे
सेलू,
blanket-loan-waiver आषाढी एकादशी जसजशी जवळ येत आहे तशी विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली असून पायदळ दिंडीत सामील होण्याची लगबग सुरू झाली आहे. एक महिना वारीत पायदळ चालणारे भाविक यात शेतकरी, शेत मजुरांचाही समावेश असतो, ते आता तरी देवा मला पावशील काय, अशी आर्त हाक विठ्ठलाला देत आहे.
मृग नक्षत्र सुरू झाले आहे. पेरणी योग्य पाऊस अजूनपर्यंत आला नाही. पेरणी करून पायदळ वारीत सामील होण्याची तयारी शेतकरी व भाविकांनी केली आहे. ३० जून पर्यंत शेतकर्यांचे कर्ज माफ करण्याचे शासनाने जाहीर केले आहे. पण, या कर्जमाफीत जाचक अटी लादल्या आहे. त्यामुळे आपल्यावर असणारे कर्ज माफ होणार की नाही, या विवंचनेत शेतकरी आहे. सततची नापिकी शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने कर्जाची परतफेड करणे शय होत नाही. त्यातच अतिवृष्टी, अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना शेतकर्यांना करावा लागत आहे. खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. यावर्षी पीक चांगले होऊ दे, अन् असलेले कर्ज सरसकट माफ होऊ दे, असे म्हणत आता तरी देवा मला पावशील का... अशी आर्त हाक शेतकरी देत असून या आर्त हाकेला विठ्ठल साद देईल, अशी आशा शेतकर्यांना आहे.
शासनाला सद् बुद्धी दे!
शेतकर्याची सरसकट कर्ज माफी व्हावी म्हणून आमदार रोहित पवार यांनी अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन पंढरपूर या तीर्थक्षेत्रात सुरू केले आहे. या आंदोलनामुळे सरसकट कर्ज माफी होण्याची शासनाला सद्बुद्धी मिळणार काय? याकडे लक्ष लागले आहे. आषाढी एकादशीसाठी गावागावातून वारकरी भाविक पंढरपूरकडे कूच करीत आहे. यावेळी पुन्हा आमचा विठ्ठल आमची आर्त हाक ऐकणार असून आम्हाला भरभरून देईल व पुन्हा एकदा नवी ऊर्जा प्रदान करतील, अशी आशा आहे.